तंबाखू वा तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका असतो, त्यामुळे सिगारेटची पाकिटे, तंबाखू- गुटख्याची पुडी यांवर कर्करोग होण्याचा इशारा दिलेला असतो. मात्र मद्याच्या बाटलीवर असा कोणताही इशारा दिलेला नसतो. अमेरिकेचे वैद्यक प्रमुख किंवा सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्ती यांनी अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असा इशारा दिला आहे. अल्कोहोलमुळे सात प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. त्यामुळे अल्कोहोलयुक्त पेयांच्या बाटल्यांवर कर्करोगाचा इशारा देण्यासंबंधी माहिती छापण्याची गरज असल्याचे त्यांनी संगितले. डॉ. मूर्ती यांनी दिलेला इशारा आणि मद्यसेवनामुळे कर्करोग होण्याची भीती यांविषयी…

अमेरिकी सर्जन जनरल मूर्ती यांचा इशारा

भारतीय वंशाचे डॉ. विवेक मूर्ती हे अमेरिकेचे सर्जन जनरल असून दोन वेळा त्यांनी या पदाचा कार्यभार सांभाळला आहे. मद्यपानामुळे कर्करोग होऊ शकतो, असा इशारा देत डॉ. मूर्ती यांनी त्यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. तंबाखूजन्य पदार्थांपेक्षा मद्यसेवन आरोग्यास फारसे हानीकारक नाही, ही धारणा बदलण्याची गरज असून मद्यपान हे धूम्रपानाइतकेच धोकादायक असल्याचे डॉ. मूर्ती सांगतात. १९६४ मध्ये अमेरिकी सर्जन जनरल यांनी दिलेल्या अहवालामध्ये धूम्रपान हे आरोग्यास किती घातक असून त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे सिगारेट सौम्य आहे ही धारणा बदलण्यास मदत झाली आणि सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर हे आरोग्यास धोकादायक असल्याचा इशारा छापण्यात येऊ लागला. मद्यपानही धूम्रपानाइतकेच आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण त्यामुळेही कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे मद्यपेयांवरही कर्करोगाचा इशारा देण्याची माहिती प्रसिद्ध करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. मूर्ती यांनी त्यांच्या निवेदनात सांगितले आहे.

हेही वाचा >>>भारताची चिंता वाढली? दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य; याचा अर्थ काय?

मद्यपानाचा आणि कर्करोगाचा संबंध… 

गेल्या काही वर्षांत जगभरातील अनेक देशांमध्ये मद्यपानाचे प्रमाण वाढलेले आहे. अमेरिकेमध्ये ७० टक्के तर भारतामध्ये २२ टक्के नागरिक मद्यसेवन करतात. दरवर्षी जगातील पाच ते साडेपाच लाख कर्करोगग्रस्तांचा मृत्यू होतो. कर्करोगाची विविध कारणे सांगितली जात असली तरी मद्यसेवन हेही कर्करोगाचे कारण असल्याचे आता अमेरिकी वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. अल्कोहोलमुळे सात प्रकारचे कर्करोग होतात, असे अमेरिकी सर्जन जनरलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मद्यामुळे चयापचय एसीटाल्डिहाइड नावाच्या रसायनात होते, जे डीएनएचे नुकसान करतात. खराब झालेल्या डीएनएमुळे पेशींचे विभाजन नियंत्रणाबाहेर होऊ शकते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका असतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. अल्कोहोल हे फ्री रॅडिकल्स नावाचे अस्थिर रेणू तयार करतात, जे डीएनएला हानी पोहोचवू शकतात आणि कर्करोग होऊ शकतो. फ्री रॅडिकल्स हे इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन यांसारख्या संप्रेरकांच्या पातळीत बदल करते, ज्यामुळे स्तन आणि प्रोस्ट्रेट ग्रंथींचा कर्करोग होऊ शकतो. अल्कोहोलमुळे बी जीवनसत्त्वे आणि फोलेट यांसारख्या महत्त्वाच्या पोषक घटकांची पातळीही कमी होते, जे कर्करोगापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात, असे अमेरिकेतील पॅथॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. शुजी ओगिनो यांनी सांगितले. 

कोणत्या कर्करोगाचा धोका अधिक?

अल्कोहोलच्या अतिरिक्त सेवनामुळे चार प्रमुख प्रकारचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. तोंड, अन्ननलिका, पोट आणि मोठे आतडे. मात्र त्याशिवाय इतर प्रकारचे कर्करोगही अल्कोहोल सेवनामुळे होऊ शकतात. सर्जन जनरलच्या अहवालानुसार अल्कोहोलचे सेवन आणि कर्करोगाच्या जोखीम यांच्यातील दुवा किमान सात प्रकारच्या कर्करोगास कारणीभूत ठरतो. स्तन, मोठे आतडे, अन्ननलिका, यकृत, तोंड, घसा आणि स्वरयंत्र. मात्र चार प्रकारचे कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक असते. अलीकडील वैद्यकीय अहवालात असे आढळून आले आहे की जगभरात दरवर्षी सुमारे ७५ हजार जणांना ओठ व तोंडाचा कर्करोग होतो. त्यापैकी २० टक्के कर्करोग अल्कोहोल सेवनामुळे होत आहे. महिलांचे मद्यसेवन करण्याचे प्रमाणही वाढले असल्याने स्तनाच्या कर्करोगाचेही प्रमाण वाढले आहे. 

हेही वाचा >>>तुमच्याकडे ‘हे’ जीपीएस आढळल्यास होऊ शकते अटक; यावर भारतात बंदी का? स्कॉटिश महिलेला का झाली अटक?

अमेरिकी सर्जन जनरलचा अहवाल काय सांगतो? 

अनेक दशकांपासून मर्यादित मद्यपान हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक टाळण्यास मदत करते, असे अमेरिकेत मानले जायचे. मात्र ते चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचे सर्जन जनरल डॉ. मूर्ती सांगतात. तंबाखूजन्य पदार्थ आणि लठ्ठपणानंतर अल्कोहोल हे अमेरिकेत कर्करोगाचे तिसरे प्रमुख कारण असल्याचे ते सांगतात. बरेच जण असे मानतात की दररोज थोड्या प्रमाणात अल्कोहोल सेवन केले की आरोग्य चांगले राहते. मात्र मद्यपानामुळे कर्करोगाचा धोका अधिक वाढतो, असा इशारा ते देतात. मद्यसेवन आणि कर्करोग यांच्या संबंधांबाबत तात्काळ जागृती आणि कृती आवश्यक असल्याचे त्यांचा अहवाल सांगतो. 

अल्कोहोलचा महिलांनाही धोका? 

अल्कोहोल पुरुष व स्त्री या दोघांसाठी कर्करोगाचा धोका वाढवते. मात्र मद्यपानाचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त असतो, असे वैद्यकीयतज्ज्ञ सांगतात. अगदी आठवड्यातून एकदा तरी अल्कोहोल सेवन केले तर कर्करोग होण्याची शक्यता महिलांना १७ टक्के अधिक आहे, असे डॉ. मूर्ती यांच्या अहवालात नमूद केले आहे. दिवसातून एकदा पेय घेतल्याने स्त्रियांना अल्कोहोलसंबंधित कर्करोग होण्याचा धोका १९ टक्के तर दिवसातून दोनदा पेये पिण्याने हा धोका जवळपास २२ टक्के असतो. पुरुषांसाठी हीच जोखीम आठवड्यातून एकापेक्षा कमी पेयेसाठी १० टक्के, दिवसातून एक पेयेसाठी ११ टक्के आणि दररोज दोन पेयांमध्ये १३ टक्के आहे. स्त्रिया अल्कोहोलसंबंधित कर्करोगास बळी पडण्याची अनेक कारणे आहेत. शारीरिक रचना हा एक घटक आहे. अल्कोहोल सेवन केल्याने शरीरातील प्रत्येक पेशी अल्कोहोलच्या संपर्कात राहते. चरबीचे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असल्याने ते हार्मोनल संतुलनात व्यत्यय आणतात. त्यामुळे स्तनांच्या कर्करोगाच्या वृद्धीला चालना मिळते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी संगितले.   

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sandeep.nalawade@expressindia.com