Ram Mandir Ayodhya Hindu Goddess Sculpture Unearthed: राम मंदिर परिसरातील कुबेर टिला मार्गावर सुरू असलेल्या खोदकामात आणखी एक महत्त्वपूर्ण पुरातत्वीय अवशेष सापडला आहे. दोन सिंहांवर उभ्या असलेल्या एका देवीचे शिल्प सापडले आहे. या शिल्पाचा कालखंड हजारो वर्षे मागे जातो आणि यामुळे अयोध्येच्या प्राचीन सांस्कृतिक वारशाला अधिक बळकटी मिळाली आहे. रामजन्मभूमी परिसरातील कुबेर टिला येथे सुरु असलेल्या विकास कामादरम्यान हे शिल्प सापडले आहे. ही देवी दोन बसलेल्या सिंहावर उभी आहे, ती हिंदू धर्मातील शैव किंवा वैष्णव पंथाशी संबंधित असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या शिल्पाची झीज झाल्यामुळे या शिल्पावरील सूक्ष्म तपशील अस्पष्ट झालेले आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाल्यापासून अशा अनेक अवशेषांचा शोध लागलेला आहे. या प्रत्येक अवशेषाचे व्यवस्थित दस्तऐवजीकरण केले जात आहे आणि त्यांचे जतनही काळजीपूर्वक करण्यात येत आहे. अलीकडील सापडलेला हा अवशेष लक्षवेधी आहे.
पवित्र भूमीखालचे इतिहासाचे प्रतिध्वनी
राम मंदिराच्या विस्तृत आराखड्याचा भाग म्हणून कुबेर टिला परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात विकासकाम सुरू आहे. हे केवळ प्रभू श्रीरामांसाठी भव्य मंदिर उभारण्यापुरते मर्यादित नसून, अयोध्येच्या दृश्यमान वारशाचे जतन आणि पुनरुज्जीवन करणे हा देखील उद्देश आहे. अलीकडील सापडलेला हा अवशेष अयोध्येच्या ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारशाशी शतकानुशतकांची नाळ जोडतो, असे पुरातत्त्वज्ञ सांगतात.
मंदिराच्या बांधकामाशी संबंधित अधिकारी आणि तज्ज्ञ यांनी सांगितले की, अलीकडे सापडलेले सिंह आणि देवीच्या आकृतीचे शिल्प भारतीय मंदिरशिल्प परंपरेतील दीर्घकाळ चालत आलेल्या प्रतीकशैलीचे प्रतिबिंब आहे. ही मूर्ती देवी दुर्गा किंवा एखाद्या प्रादेशिक देवतेचे प्रतिनिधित्व करत असून ती इ.स. ६ व्या ते ९ व्या शतकातील असावी, असा अंदाज आहे. अयोध्येचा अविरत चालत आलेला पवित्र वारसा लक्षात घेता, अशा चिन्हांमधून त्या स्थळी झालेल्या उपासना परंपरांच्या खोल आणि टप्प्याटप्प्याने घडत गेलेल्या उत्क्रांतीचे दर्शन घडते.
राम मंदिर स्थळावरील आधीचे शोध
हा एकच अपवादात्मक शोध नाही. २०२० पासून मंदिराच्या खोल पायाभरणीचे काम सुरू झाले, तेव्हापासून अनेक प्राचीन अवशेष सापडले आहेत. यामध्ये तीन रिंग विहिरी, प्राणी आणि मानव आकृतींची मृत्तिकाशिल्पं, नक्षीदार विटा आणि तांब्याच्या वस्तू यांचा समावेश आहे. हे सर्व सुमारे ४० फूट खोल स्तरावर सापडले.
तज्ज्ञ या अवशेषांचा संबंध मौर्य, शुंग आणि कुषाण काळाशी जोडतात. अभ्यासकांच्या मते हे अवशेष इ.स.पू. ३ ऱ्या शतकापर्यंत मागे जातात. ट्रस्टने संपर्क साधलेल्या काही अभ्यासकांनी रेडिओकार्बन डेटिंगच्या माध्यमातून यापेक्षाही प्राचीन काळातील संकेत मिळू शकतात, असे सूचित केले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे सांस्कृतिक अवशेष इ.स.पू. १६८० सालापर्यंतचे असू शकतात, त्यामुळे अयोध्येच्या भूमीत ३६०० वर्षांहून अधिक ऐतिहासिक सातत्य असल्याचा संकेत मिळतो.
२००३ मधील एएसआयचे उत्खनन : कायदेशीर वळणाचा टप्पा
२००३ साली, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) वादग्रस्त स्थळी एक उच्चस्तरीय उत्खनन मोहीम राबवली. या तपासणीत बाबरी मशिदीखाली पूर्वीचे धार्मिक वास्तू अवशेष (ज्यामध्ये कोरीव स्तंभ, देवालयाचा पाया व नक्षीदार दगड यांचा समावेश होता) समोर आले. या निष्कर्षांना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या २०१९ च्या ऐतिहासिक निर्णयात मान्यता दिली आणि वादग्रस्त जमीन हिंदू पक्षाला मंदिर बांधणीसाठी दिली.
एएसआयचा अहवाल, साक्षीपुरावे आणि सापडलेले अवशेष यांनी मिळून या स्थळाचा ऐतिहासिक हिंदू संबंध कायदेशीरदृष्ट्या सिद्ध करण्यात निर्णायक भूमिका बजावली.
सातत्यपूर्ण जतन आणि भविष्यातील संग्रहालय
या सांस्कृतिक ठेव्याचे संरक्षण करण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने विशेष जतन पथक स्थापन केले आहे. मंदिराच्या बांधकामादरम्यान सापडलेल्या अवशेषांची नोंद केली जात आहे आणि हे अवशेष मंदिर संकुलात उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयात प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.
राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी स्पष्ट केले की, बांधकामादरम्यान सापडलेले सर्व अवशेष काळजीपूर्वक जतन केले जात आहेत. हे केवळ दगड नाहीत, तर अयोध्येच्या प्राचीन वारशाची साक्ष देणारे पुरावे आहेत. त्यांची नोंद व्यवस्थित केली जात असून, मंदिर संकुलातील संग्रहालयात ते ठेवण्यात येणार आहेत, जेणेकरून पुढील पिढ्यांना या वारशाची माहिती मिळेल.
ट्रस्टने याबरोबर कला इतिहासकार आणि शिलालेख वाचक (एपिग्राफिस्ट) यांनाही सहभागी करून घेतले आहे, जेणेकरून सापडलेल्या दगडांवरील चिन्हे आणि शिलालेख यांचे विश्लेषण करता येईल. यातील अनेक चिन्हांचा अर्थ अजूनही पूर्णतः स्पष्ट झालेला नाही.