India’s Rudram -2 Missile संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) बुधवारी (२९ मे) ओडिशाच्या किनाऱ्यावर हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रुद्रम-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. स्वदेशी बनावटीचे रुद्रम-२ हे क्षेपणास्त्र हवेतून शत्रूचे रडार भेदण्यास सक्षम आहे. डीआरडीओद्वारे तयार करण्यात आलेल्या रुद्रम-२ क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई-३० एमके-१ द्वारे करण्यात आली. सकाळी ११.३० च्या सुमारास हे परीक्षण करण्यात आले. या चाचणीमध्ये रुद्रम-२ सर्व निकषांमध्ये परिपूर्ण बसले आहे. रुद्रम-२ क्षेपणास्त्र कसे कार्य करते? भारतासाठी या चाचणीचे महत्त्व काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

रुद्रम-२ ही स्वदेशी विकसित वायु-प्रक्षेपित क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’नुसार, रुद्रमचा अर्थ होतो, दु:ख दूर करणारे. हे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, जे शत्रूचे क्षेत्र नष्ट करण्यास सक्षम आहे, तेही शत्रूला थांगपत्ता लागू न देता. रुद्रम क्षेपणास्त्रे ही भारताची पहिली स्वदेशी अॅंटी रेडिएशन क्षेपणास्त्रे आहेत. भारतीय हवाई दलासाठी (आयएएफ) ही क्षेपणास्त्रे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केली आहेत.

हेही वाचा : विष्ठा आणि कचर्‍याने भरलेले फुगे उत्तर कोरिया कुठे पाठवतोय? हे संपूर्ण प्रकरण काय? जाणून घ्या…

हवाई लढाईत या क्षेपणास्त्राचे महत्त्व किती?

क्षेपणास्त्राची कामगिरी जहाजांसह, इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूरद्वारे तैनात इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टीम, रडार आणि टेलिमेट्री स्टेशन्स यांसारख्या रेंज ट्रॅकिंग उपकरणांद्वारे घेतल्या गेलेल्या उड्डाण डेटावरून प्रमाणित करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एनडीटीव्हीनुसार हे क्षेपणास्त्र जास्तीत-जास्त अंतरावरून सोडले जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि रडारमधून १०० किलोमीटरवरील सिग्नल शोधू शकते आणि क्षेपणास्त्रही नष्ट करू शकते.

रुद्रम-२ चा वेग २४६९.६ किलोमीटर प्रति तास आहे. ‘बिझनेस टुडे’च्या वृत्तानुसार, या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३०० किलोमीटर आहे. विविध राज्यांतील डीआरडीओ प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या अनेक अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञानाचा या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारत सध्या आपल्या सुखोई लढाऊ विमानांमध्ये रशियाच्या केएच-३१ क्षेपणास्त्राचा वापर करतो. परंतु, आता रुद्रम-२ क्षेपणास्त्र केएच-३१ ची जागा घेणार आहे, त्यामुळे या स्वदेशी क्षेपणास्त्राचे महत्त्व देशासाठी अधिक आहे.

रुद्रम-१ क्षेपणास्त्र

रुद्रम-१ क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे विकसित केलेले पहिले अॅंटी रेडिएशन क्षेपणास्त्र (एआरएम) होते. एआरएम क्षेपणास्त्रे रेडिओ फ्रिक्वेन्सी स्रोतांसह शत्रू संरक्षण प्रणाली शोधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. २०२० मध्ये रुद्रम-१ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी भारतीय वायुसेनेने ओडिशाच्याच समुद्र तटावर केली होती. क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी पूर्व लडाखमध्ये चीन आणि भारताच्या सीमारेषेदरम्यानही झाली.

पहिले क्षेपणास्त्र रेडिओ फ्रिक्वेन्सीवरून लक्ष्य शोधण्यात सक्षम आहे, तर दुसरे क्षेपणास्त्र विविध हवामान परिस्थितीत कार्य करण्यास सक्षम आहे. रुद्रम-१ ची रेंज १०० ते १५० किलोमीटर आहे. याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट आहे आणि जमिनीपासून एक ते १५ किलोमीटर उंचीवरून हे क्षेपणास्त्र सोडले जाऊ शकते. मे २०१९ मध्येही भारतीय वायु सेनेने सुखोई लढाऊ विमानातून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. ब्रह्मोस क्षेपणास्त्रमध्ये दिवसा व रात्री, समुद्र व जमिनीवर अचूक मारा करण्याची क्षमता आहे.

हेही वाचा : दिल्लीमध्ये उष्णतेचे सर्व रेकॉर्डब्रेक, जगभरातही हीच परिस्थिती; तापमान आणखी किती वाढणार?

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया

‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार, रुद्रम-२ ची यशस्वी उड्डाण-चाचणी ही भारतीय हवाई दलासाठी मोठी उपलब्धी आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी असल्याने याचे महत्त्व अधिक वाढते. “भारताची हवाई सुरक्षा मजबूत करण्यासाठी क्षेपणास्त्र प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल,” अशी अपेक्षा असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आणि रुद्रम-२ च्या यशस्वी चाचणी उड्डाणाबद्दल भारतीय हवाई दल आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अभिनंद केले. सिंह म्हणाले की, यशस्वी चाचणीने सशस्त्र दलांना अधिक मजबूत केले आहे. ‘बिझनेस टुडे’च्या मते, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था रुद्रम-३ वरदेखील काम करत आहे. क्षेपणास्त्राचा पल्ला ५०० किलोमीटरपर्यंत वाढवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

Story img Loader