टेक कंपनी अॅपलने आपल्या कंपनीच्या नेतृत्वात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (२७ ऑगस्ट) कंपनीचे दिग्गज लुका मेस्त्री यांच्या जागी केवन पारेख यांची मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२५ पासून ते आपला पदभार स्वीकारतील. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कूक यांनी एका निवेदनात म्हटले आहे, “एक दशकाहून अधिक काळ केवन अॅपलच्या फायनान्स लीडरशिप टीमचे एक सदस्य आहेत. ते कंपनीला व्यवस्थितरीत्या समजून घेतात. त्यांची तीक्ष्ण बुद्धी, निर्णयक्षमता यांमुळे ते अॅपलच्या सीएफओ पदासाठी योग्य आहेत.” केवन पारेख कोण आहेत? जाणून घेऊ.
कोण आहेत केवन पारेख?
१९७२ मध्ये जन्मलेले केवन पारेख यांनी मिशिगन विद्यापीठातून बॅचलर ऑफ सायन्समध्ये पदवी प्राप्त केली आहे आणि शिकागो विद्यापीठातून एमबीए केले आहे. ते इलेक्ट्रिकल अभियंता आहेत. अॅपलमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी थॉमसन रॉयटर्स आणि जनरल मोटर्समध्ये विविध वरिष्ठ पदांवर काम केले आहे. ते अॅपलबरोबर ११ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांनी सर्वांत आधी कंपनीच्या काही व्यावसायिक विभागांसाठी आर्थिक साह्य प्रमुख म्हणून काम केले होते. सध्या ते आर्थिक नियोजन, गुंतवणूकदार संबंध व बाजार संशोधन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचे व्यवस्थापन करीत आहेत. ‘ब्लूमबर्ग’च्या एका अहवालानुसार, मेस्त्री हे काही महिन्यांपासून केवन यांना सीएफओ पदासाठी तयार करीत होते.
“मेस्त्री हे अनेक महिन्यांपासून पारेख यांना सीएफओच्या भूमिकेसाठी तयार करीत होते आणि अॅपलने पारेख यांना पुढील वित्त प्रमुख म्हणून नियुक्त करण्याची तयारीदेखील केली होती. पारेख हे अॅपलच्या आर्थिक विश्लेषक आणि भागीदारांबरोबरच्या खासगी बैठकांमध्येही हजर असतात,” असे ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालात सांगण्यात आले. अॅपलचे सीएफओ म्हणून पारेख मोठी गुंतवणूक, वित्तपुरवठा यांबाबतचे निर्णय घेऊन आणि प्रमुख भागधारकांशी समन्वय साधून कंपनीचे वित्त आणि धोरण व्यवस्थापित करतील. एका निवेदनात मेस्त्री म्हणाले, “पारेख या भूमिकेसाठी योग्य आहेत. अॅपलवर त्यांचे मनापासून प्रेम आहे. निर्णय घेण्याची क्षमता आणि आर्थिक क्षेत्रातील त्यांची हुशारी यांमुळे ते पुढील सीएफओ होण्यास पात्र आहेत.”
हेही वाचा : कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतीयांना धक्का; आता कॅनडात भारतीयांना नोकरी मिळणे कठीण; कारण काय?
जागतिक कंपन्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी होणार्या भारतीय वंशाच्या लोकांच्या विस्तारणाऱ्या यादीत आता पारेख यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. या यादीत मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला, अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, अडोबचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण व टेस्लाचे सीएफओ वैभव तनेजा यांचा समावेश आहे.