पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांची संपत्ती आणि कराबाबतचे कागदपत्रे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या प्रकरणी पत्रकार शाहिद अस्लम यांना अटकही झाली. यानंतर पाकिस्तान सरकारच्या कारवाईवर जोरदार टीकाही झाली. अखेर, बुधवारी (१८ जानेवारी) इस्लामाबादच्या सत्र न्यायालयाने शाहिद अस्लम यांना जामीन मंजूर केला. त्यांना ५० हजार रुपयांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. या निमित्ताने पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख बाजवांची नेमकी कोणती माहिती सार्वजनिक करण्यात आली? ही संपत्ती उघड करणारा पत्रकार कोण आहे? माजी लष्करप्रमुख बाजवा यांच्यावर नेमके काय आरोप आहेत? याचा हा आढावा…

अटक करण्यात आलेले पत्रकार शाहित अस्लम यांच्यावर माजी लष्करप्रमुख बाजवा, त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या संपत्तीची आणि कराबाबतची माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पत्रकार शाहिद अस्लम यांच्यावर पाकिस्तान दंड संहितेच्या कलम २१६ नुसार (कोठडीतून पळून गेलेला किंवा ज्याच्या अटकेचा आदेश देण्यात आला आहे असा आरोपी) गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलं, असं वृत्त डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

२०२२ मध्ये पाकिस्तानमधील फॅक्ट फोकस नावाच्या (Fact Focus) ऑनलाइन न्यूज पोर्टलने एक वृत्त प्रकाशित केलं. त्यात पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख बाजवा पदावर आल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने सहा वर्षांत १२७० कोटींची (पाकिस्तानी रुपये) संपत्ती जमवली, असा आरोप आहे.

फॅक्ट फोकसच्या वृत्तानुसार, जावेद बाजवा लेफ्टनंट जनरल झाल्यानंतर सहा वर्षांच्या काळात त्यांच्या कुटुंबाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यवसाय करणयास सुरुवात केली. अनेक परदेशी मालमत्ता खरेदी केल्या, परदेशात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, इस्लामाबाद आणि कराचीमध्ये व्यावसायिक प्लाझा, व्यावसायिक जमीन भूखंड, भव्य फार् महाऊसही खरेदी केले. लाहोरमधील रिअल इस्टेटमध्येही व्यवसाय करण्यास सुरुवात केली.

बाजवा यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती होण्याआधी काही आठवडे त्यांची पत्नी आयेशा अमजद यांनी २०१६ मध्ये कर फायलर म्हणून नोंदणी केली होती. त्यानंतर त्यांच्या मालमत्तेत सहा वर्षात झपाट्याने वाढ झाली. याशिवाय बाजवा यांची सून माहनूर साबीरच्या नावावरही ऑक्टोबर २०१८ मध्ये काहीही मालमत्ता नव्हती. मात्र, तिच्या लग्नाच्या एक आठवडा आधी नोव्हेंबरमध्ये तिच्या नावावर एक अब्जांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता झाली. विशेष म्हणजे २०१९ मध्ये साबीरची दुबईच्या पेट्रोलियम कंपनीची पाकिस्तानमधील ‘मॅनेजर’ बनली. या कंपनीची काही दिवसांपूर्वीच स्थापना झाली होती आणि त्यांनी संपूर्ण पाकिस्तानमध्ये आपला व्यवसाय सुरू केला होता.

बाजवा यांची सून महनूर साबीरबरोबरच तिच्या बहिणी, आई, वडील आणि काकांच्याही संपत्तीत अचानक वाढ झाल्याचं या वृत्तात सांगण्यात आलं. तसेच सरकारी पदाचा वैयक्तिक संपत्ती वाढवण्यासाठी दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला.

पत्रकार शाहिद अस्लमला अटक का?

फॅक्ट फोकसने माजी लष्कर प्रमुख बाजवा यांच्यासह कुटुंबियांच्या संपत्तीबाबत जे वृत्त प्रकाशित केलं. त्यात बाजवा आणि कुटुंबाच्या संपत्ती आणि करविषयक कागदपत्रांचाही उल्लेख होता. तसेच ही कागदपत्रे पत्रकार शाहित अस्लम यांनी फॅक्ट फोकसला पुरवल्याचा आरोप आहे.

नोव्हेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी जिओ न्यूजला सांगितले की, ही गोपनीय माहिती सार्वजनिक करणाऱ्याची ओळख पटली आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणालाही करविषय कागदपत्रे सार्वजनिक करता येत नाहीत. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले आहे.

शाहीद अस्लम यांना शुक्रवारी (१४ जानेवारी) कागदपत्रे सार्वजनिक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. इस्लामाबादच्या स्थानिक न्यायालयाने दुसऱ्या दिवशी त्यांना दोन दिवसांची कोठडी मंजूर केली. अस्लम यांच्यावर ‘फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू’च्या कार्यालयात जाऊन बेकायदेशीरपणे जनरल बाजवा यांच्या संपत्तीविषयीचे कागदपत्रे मिळवल्याचा आरोप आहे. याच कागदपत्रांचा वापर फॅक्ट फोकसचे पत्रकार अहमद नूरानी यांनी केला आणि वृत्त प्रकाशित केलं.

“शाहिद अस्लम एफबीआरला का भेट देत होता? कारण त्याला माहिती मिळवायची होती,” असे फिर्यादी म्हणाले, जर ते दोषी आढळले तर अस्लमला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे डॉनने वृत्त दिले.

अटकेवर पत्रकार शाहीद अस्लम यांची प्रतिक्रिया

या प्रकरणी अस्लम यांच्या वकिलांनी अस्लम यांनीच ही कागदपत्रे सार्वजनिक केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं म्हणत ते निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे पोलिसांकडून अस्लम यांच्या फोन आणि लॅपटॉपच्या पासवर्डची मागणी होत आहे. यावर अस्लम यांनी पत्रकार म्हणून त्यांच्या सूत्रांची गोपनीयता राखण्यासाठी असा कोणताही पासवर्ड देणार नाही, असं सांगितलं आहे. कोर्टाच्या बाहेर येताना पत्रकार अस्लम यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. यानंतर शाहिद अस्लम तपासात सहकार्य करत नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.

अस्लम यांच्या अटकेवर तीव्र प्रतिक्रिया

पत्रकार शाहिद अस्लम यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. लाहोर प्रेस क्लबने तीव्र निषेध करत तात्काळ अस्लम यांची सुटका करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : विश्लेषण: भारतावर सात वेळा हल्ले करणारा मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित; चीननंही पाठिशी घातलेला मक्की आहे तरी कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी सिनेटर मुस्तफा नवाज खोखर यांनीही या अटकेवर टीका केली. तसेच पाकिस्तान सरकारने वाढता दहशतवाद आणि बिघडणारी अर्थव्यवस्था यावर लक्ष द्यावं, असा सल्ला दिला. सरकारी कार्यालयातील माहिती सार्वजनिक करण्यात चुकीचं काय आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे बाजवा यांना वृत्तातील माहिती चुकीची वाटली तर त्यांनी मुद्देसूदपणे पुरावे देत ते सांगावं, असं फॅक्ट फोकसने म्हटलं आहे.