– ज्ञानेश भुरे

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचा प्रसार आणि लोकप्रियता वाढू लागल्यावर अनेक देश भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अनुकरण करायला लागले. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज देशांनी यात आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेनेही अनेक वर्षे यात उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे तीन प्रयत्न फोल ठरले. यंदा मात्र त्यांना या स्पर्धेला मुहूर्त मिळालाच. आता ही लीग ‘एसए२०’ या नावाने ओळखली जाते आहे.

‘एसए२०’ लीगचे वेगळेपण काय आहे?

या लीगचे वेगळेपण म्हणजे संघांना नाणेफेकीपूर्वी १३ खेळाडूंची नावे देता येणार आहेत. नाणेफेक झाल्यावर ते आपल्या अंतिम ११ खेळाडूंची नावे जाहीर करतील. थोडक्यात काय, तर प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी यावर अंतिम संघ निवड केली जाईल. या नव्या लीगमध्ये सहा संघ असतील आणि स्पर्धा साखळी फेरी (राउंड रॉबिन) पद्धतीने खेळविली जाईल. यातील प्रत्येक संघ घरच्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर सामने खेळतील. त्यानंतर पहिल्या चार संघांत उपांत्य फेरीचे सामने होतील आणि मग अंतिम सामना होईल. खेळाडूंसाठी लिलाव झाला, तेव्हा प्रत्येक संघाला १८ खेळाडूंना घेण्याची मान्यता होती. यातील बहुतेक खेळाडू दक्षिण आफ्रिकेचेच आहेत. प्रत्यक्ष सामन्यात संघांना चार परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवण्याची परवानगी आहे.

ही स्पर्धा ‘आयपीएल’सारखीच आहे का?

‘आयपीएल’कडून प्रेरणा घेऊनच ही स्पर्धा होत असल्याने त्यात साम्य असणार यात शंकाच नाही. या दोन स्पर्धांत इतके सारखेपण आहे की, ‘आयपीएल’मधील सहा फ्रेंचाइजींनीच येथील संघ खरेदी केले आहेत. जोबर्ग सुपर किंग्ज (चेन्नई सुपर किंग्ज), प्रिटोरिया कॅपिटल्स (दिल्ली कॅपिटल्स), डर्बन सुपर जायंट्स (लखनऊ सुपर जाएंट्स), सनरायजर्स इस्टर्न केप (सनरायजर्स हैदराबाद), पर्ल रॉयल्स (राजस्थान रॉयल्स), एमआय केपटाऊन (मंबई इंडियन्स) अशी सहा संघांची नावे आहेत.

लीगमधील गुंतवणूक किती आहे?

‘आयपीएल’च्या फ्रेंचाइजींकडूनच संघ खरेदी केले गेल्यामुळे ओघानेच या लीगमधील गुंतवणूक मोठी राहिली. या लीगच्या गुंतवणुकीची अधिकृत आकडेवारी जाहीर केली गेली नसली, तरी बहुतेक फ्रेंचाइजींनी खरेदीसाठी दहा लाख डॉलर मोजले असल्याचे समजते. यातील जोहान्सबर्ग आणि केप टाऊन या दोन फ्रेंचाइजी सर्वांत महाग ठरल्या असून, यासाठी तब्बल २८ लाख डॉलरचा व्यवहार झाला आहे. या लीगच्या थेट प्रसारणाच्या करारातून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळणार असल्याने फ्रेंचाइजींना एक वर्षातच फायदा होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या लीगमध्ये ४० लाख डॉलरपेक्षा अधिक पारितोषिक रक्कम मिळणार आहे. लीगमध्ये ट्रिस्टन स्टब्सला लिलावत सर्वाधिक ५ लाख २० हजार डॉलर इतकी बोली लागली.

या लिगचा दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय कामगिरीवर परिणाम होईल?

‘एसए२०’ लीग निश्चितपणे दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य कार्यक्रमाच्या आड येत आहे. करोनाच्या उद्रेकानंतर त्यांचे २०२०मधील अनेक सामने पुढे ढकलण्यात आले. इंग्लंडने दौरा अर्धवट सोडला. आता एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेला थेट पात्र व्हायचे असल्यास त्यांना आता येणारे सामने खेळावेच लागतील. दक्षिण आफ्रिका सध्या एकदिवसीय सुपर लीगच्या गुणतालिकेत ११व्या स्थानावर आहे. थेट पात्र ठरण्यासाठी त्यांना आठव्या स्थानावर यायचे आहे आणि त्यासाठी आता दक्षिण आफ्रिकेच्या हातात केवळ पाच सामने आहेत. या पाचपैकी तीन सामने जिंकले, तरच ते विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. अन्यथा त्यांना पात्रता फेरीत खेळावे लागेल.

दक्षिण आफ्रिकेसाठी ही लीग का महत्त्वाची?

दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेटला या लीगची नितांत गरज आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडे पैशाची कमतरता आहे. थबांग मोरो मुख्य कार्यकारी अधिकारी असताना दक्षिण आफ्रिकेने बहुतेक सर्व प्रायोजक गमावले. दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट आर्थिक संकटात आहे. स्थानिक तीन स्पर्धा आणि दक्षिण आफ्रिकेचा मुख्य संघ गेली दोन वर्षे पुरस्कर्त्याशिवाय खेळत आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेची तिजोरी रिकामी व्हायला लागली आहे. ती लवकर भरली गेली नाही, तर एक-दोन वर्षांहून अधिक काळ ते टिकू शकणार नाहीत.

हेही वाचा : विश्लेषण : पृथ्वी शॉचे रणजी करंडकात धडाकेबाज त्रिशतक! भारतीय संघाची दारे पुन्हा उघडणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवळ पैसाच नाही, तर येथील क्रिकेटचा प्रसारही खुंटला आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी निराशाजनक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांनी क्रिकेटकडे पाठ फिरवली आहे. चाहत्यांना पुन्हा क्रिकेटकडे वळवण्यासाठी उत्तम खेळासह मनोरंजनाची गरज आहे आणि त्यासाठी ‘एसए२०’ लीग हे एकमेव माध्यम आहे.