Kolhapuri chappals prada controversy जगभरात कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध आहे. नऊ वारी किंवा इतर सर्वच पारंपरिक कपड्यांवर ही चप्पल उठावदार दिसते. मात्र, सध्या कोल्हापुरी चप्पल हा जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. इटलीत पार पडलेल्या फॅशन शोमध्ये प्राडा (Prada) नावाच्या एका जगविख्यात कंपनीवर कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड चोरी केल्याचा आरोप केला जात आहे. त्यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या चप्पलची किंमत. आपल्याकडे कोल्हापुरी चप्पल जास्तीत जास्त एक हजार रुपयांपर्यंत मिळते. मात्र, ही कंपनी हुबेहूब असलेली कोल्हापुरी चप्पल तब्बल एक लाख रुपयांना विकत असल्याचेही दावे केले जात आहेत.
लक्झरी फॅशन ब्रँड असलेल्या प्राडाने आपल्या नवीन कलेक्शनमध्ये या चप्पल लाँच केल्या आहेत. त्यांनी इटलीत आयोजित केल्या गेलेल्या फॅशन शोमध्ये ‘मेन स्प्रिंग समर २०२६’ कलेक्शन सादर केले. त्या शोमध्ये त्यांच्या प्रत्येक मॉडेलच्या पायात ही चप्पल झळकली. कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापूरची खास ओळख आहे. त्यामुळे भारतीयदेखील त्यावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करताना दिसत आहेत. कोल्हापुरी चप्पल म्हणजे काय? विदेशांतील फॅशन शोमध्ये ही चप्पल झळकल्याने वाद का निर्माण झाला आहे? त्याविषयी जाणून घेऊ…
भारतीय हस्तकलेची ओळख – कोल्हापुरी चप्पल
- कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापूरसह महाराष्ट्राचीदेखील ओळख आहे.
- कोल्हापुरी चपलेचा इतिहास १२ व्या शतकाशी जोडलेला आहे.
- या चप्पल पारंपरिक हस्तकलेतून तयार करण्यात आल्या आहेत.
- प्रामुख्याने चामड्याचा वापर केलेल्या या चपलांवर हाताने विणकाम केलेले असते.
- अतिशय आरामदायी असलेल्या या चपला आरोग्यासाठीही गुणकारी असल्याचे म्हटले जाते. या चप्पलमध्ये वापरण्यात येणारे चामडे शरीरातील उष्णता शोषून घेते आणि त्यामुळे चपलेचा रंगही अधिक गडद होत जातो.
- त्यांची डिझाईन अन् चप्पलचा नैसर्गिक तपकिरी रंग हीदेखील त्याची वैशिष्ट्ये आहेत.
- मुख्य म्हणजे या चप्पल तयार करताना कोणत्याही प्रकारचे लोखंडी खिळे किंवा मशीन वापरले जात नाही. रासायनिक रंगांऐवजी त्यात भटकंतीतून मिळणारे नैसर्गिक रंग वापरले जातात.
कोल्हापुरी चप्पल अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली आहे. सणासुदीला पारंपरिक कपड्यांवर ही चप्पल आवर्जून परिधान केली जाते. २०१९ मध्ये या चपलांना भौगोलिक मानांकन (Geographical Indications,जीआय) प्राप्त झाले आहे. एखादे उत्पादन विशिष्ट भागातच घेतले जात असेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल, तर त्याला भौगोलिक मानांकन दिले जाते. कोणत्याही उत्पादनाला भौगोलिक मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते. जीआय टॅग मिळाल्याने अधिकृतपणे या चप्लेचे सांस्कृतिक आणि प्रादेशिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. “कोल्हापुरी चपला ही फक्त पादत्राणे नाहीत, तर त्या भारताच्या वारशाचे प्रतीक आहेत,” असे मुंबईतील एका फॅशन ब्लॉगरने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.
कोल्हापुरी चप्पलवरून सुरू झालेला वाद नक्की काय आहे?
फॅशन तज्ज्ञ व सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, प्राडाने त्यांच्या सँडलच्या डिझाईनसाठी कोल्हापुरी चप्पलला श्रेय दिले नाही. त्यांचे डिझाइन अगदी कोल्हापुरी चप्पलला मिळणारे आहे. त्यात तेच तपकिरी चामडे, पायाचा अंगठा व आकार दिसून येतो; परंतु ब्रँडच्या शो नोट्समध्ये भारत किंवा भारतातील कारागीरांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यावरूनच मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. जागतिक ब्रँड भारतीय संस्कृतीतून अनेक गोष्टी घेतात; पण भारताला श्रेय देत नाही, हे चुकीचे आहे, असे एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले आहे.
‘एक्स’वरील एका वापरकर्त्याने म्हटले, “प्राडा कोल्हापुरी चप्पल १.२ लाखांना विकत आहे. महाराष्ट्राच्या वारशाचं प्रतीक असलेल्या या हस्तनिर्मित चप्पल कोल्हापूरच्या बाजारपेठेत ३०० ते १५०० रुपयांना विकल्या जातात. प्राडा त्यावर स्वतःचा लोगो लावून, त्यांना ‘लेदर सँडल’ म्हणते आणि आपली सांस्कृतिक मुळे पुसून टाकते. ही लक्झरी नसून चोरी आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की, ही डिझाईन भारतातील चमार समुदायाकडून चोरण्यात आली आहे. ते पिढ्यान् पिढ्या या चप्पल हाताने विणून तयार करीत आहेत. त्यांना कोणतेही श्रेय देण्यात आलेलं नाही. ही लक्झरी ब्रँडिंगने केलेली चोरी आहे.”
आणखी एका वापरकर्त्याने म्हटले, “प्राडा तुम्ही आमची कोल्हापुरी पादत्राणे घेतली आणि कोल्हापूरच्या नावाचा उल्लेखही नाही. ही फक्त पादत्राणे नाहीयेत, तर ही आमची ओळख आहे. आम्हाला आमचा आदर द्या किंवा आमच्या कलेची चोरी करणे थांबवा.” हा वाद वाढत असताना अनेक जण जागतिक फॅशन हाऊसेसकडे पारंपरिक डिझाइनचे सांस्कृतिक महत्त्व ओळखण्याची आणि ते तयार करणाऱ्या समुदायांना श्रेय देण्याची व त्यातून मिळणारा नफा वाटून घेण्याची मागणी करीत आहेत. कोल्हापुरी चप्पलच्या वादाने ‘स्कॅंडिनेव्हियन स्कार्फ’ वादाची आठवण झाली आहे. यपूर्वीही भारतीय दुपट्ट्याला वेस्टर्न ब्रँड्सनी नवीन नाव देऊन लाँच केले होते.
संस्कृतीची चोरी
संस्कृतीचे कौतुक करणे आणि तिची चोरी करणे, यात खूप फरक आहे. भारतीय डिझाइन्सनी जगभराचे लक्ष वेधले आहे, ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. परंतु, जेव्हा हे ब्रँड्स या डिझाइन्स कुठून आल्या आहेत हे सांगितल्याशिवाय त्यातून नफा मिळवतात, तेव्हा समस्या निर्माण होतात. एका फॅशन ब्लॉगरने म्हटले, “कोल्हापुरी चप्पल भारताची आहे. जर ती जागतिक स्तरावर पोहोचली असेल, तर तो आनंदाचा क्षण आहे; परंतु त्या चपलेला ती ओळखही मिळायला हवी.” प्राडाच्या सँडल स्टायलिश असू शकतात; परंतु त्यांनी सुरू केलेला हा वाद गंभीर आहे. अशा गंभीर प्रकरणांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.