Pakistan 32 people 30 killed in two Days : दहशतवादाला खतपाणी घालून भारताविरोधात कुरघोडीचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला निसर्गाने चांगलाच तडाखा दिला आहे. शुक्रवारी व शनिवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पाकिस्तानमध्ये महापुराचं संकट निर्माण झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने पुढील २४ ते ४८ तासांत देशातल्या विविध भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर महापुराचा अलर्टही जारी करण्यात आल्याची माहिती ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिली आहे. हवामानबदलाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश होतो. दरम्यान, या देशावर नैसर्गिक संकटे नेमकी कशामुळे येत आहेत? ते जाणून घेऊ…
पाकिस्तान सरकारने संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल फ्रेमवर्क करार (UNFCCC) अंतर्गत सादर केलेल्या द्वैवार्षिक पारदर्शकता अहवालात असं नमूद केलंय की, पाकिस्तानला २०२५ मध्ये हवामान बदलामुळे सर्वाधिक धोकादायक देश म्हणून ओळखण्यात आलं आहे. हवामानाशी संबंधित वारंवार होणाऱ्या आपत्तीमुळे पाकिस्तानला सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.
पाकिस्तानमधील संकटांना मानवी चुकाही जबाबदार
पाकिस्तानवर येणाऱ्या नैसर्गिक संकटाला या देशातील भौगोलिक रचनाही तितकीच कारणीभूत आहे.’Al Jazeera’च्या वृत्तानुसार, पाकिस्तामध्ये १३ हजारपेक्षा अधिक हिमनद्या आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे या हिमनद्या वितळत असल्यामुळे महापुराचा धोका वाढला आहे. त्याशिवाय उष्णतेच्या लाटा, अवकाळी पाऊस, दुष्काळ व भूकंप अशा नैसर्गिक संकटांना पाकिस्तानला वारंवार तोंड द्यावे लागत आहे. ही संकटे पाकिस्तान व उत्तर भारतात बऱ्याच प्रमाणात समान आहेत. पाकिस्तानमध्ये वारंवार येणाऱ्या संकटांना फक्त निसर्गच नाही, तर राजकीय आणि प्रशासकीय हलगर्जीपणाही कारणीभूत आहे. दूरदृष्टी नसलेली धोरणे, पायाभूत सुविधांची कमतरता व पर्यावरणरक्षणाकडे होणारे दुर्लक्ष यांमुळे पाकिस्तानवर एकपाठोपाठ एक नैसर्गिक संकटे येत आहेत.
आणखी वाचा : DAP Fertilizer Shortage : खरीप हंगामात डीएपी खताची टंचाई; चीनमुळे शेतकरी कसे अडचणीत आले?
पाकिस्तानला पावसाने कसा तडाखा दिला?
- पाकिस्तानमध्ये शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली.
- पंजाब प्रांतात झालेल्या वादळी पावसामुळे घरांची छपरे उडून गेली आणि त्यात अनेकांचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉन या वृत्तपत्राने दिली.
- शनिवारी स्वात नदीच्या काठावर बसून, नाश्ता करीत असलेले पर्यटक अचानक आलेल्या पुरामध्ये वाहून गेले.
- या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जोरदार निदर्शने केली आणि बचाव पथक वेळेवर पोहोचले नसल्याचा आरोप केला.
नागरी सुविधांची कमतरता आणि झोपडपट्ट्यांची वाढ
पाकिस्तानमधील ग्रामीण भागात अजूनही पुरेशा सुविधा नाहीत. त्यात देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असल्याने अनेक जण रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे शहरांभोवती झोपडपट्ट्यांचे जाळेही वाढले आहे. यूएन हॅबिटॅटच्या २०२३ च्या अहवालानुसार, पाकिस्तानातील ५० टक्क्यांहून अधिक शहरी लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी लोकसंख्येची घनता वाढत असल्याने तिथे ‘हीट आयलंड इफेक्ट’ म्हणजेच उष्ण वातावरण निर्माण होते. त्यामुळे उष्णतेच्या लाटा निर्माण होऊन, त्यात अनेकांना आपले प्राण गमावावे लागतात, असे पाकिस्तानमधील एका हवामान तज्ज्ञाने सांगितले आहे.

शहरी भागातील प्रदूषण ठरतंय कारणीभूत
यूएन हॅबिटॅटच्या अहवालानुसार, पाकिस्तानातील शहरी भागांमध्ये वायुप्रदूषण खूपच वाढत आहे. पर्यावरणीय समस्या, वाहनांची संख्या झपाट्याने वाढणे, औद्योगिक कारखान्यांमधून निघत असलेल्या धुरावर नियंत्रण न ठेवणे आणि प्लास्टिकसह घनकचरा उघड्यावर जाळणे ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे पाकिस्तानमधील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि जीवनमान धोक्यात येत आहे.
“पाकिस्तानात मृत्यूचे तांडव येईल”
पाकिस्तानातील काही राजकीय नेत्यांनी असा आरोप केलाय की, हवामान बदलासारख्या या गंभीर प्रश्नांकडे सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पाकिस्तानचे माजी केंद्रीय मंत्री शेरी रेहमान यांनी २७ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केली. त्यात ते म्हणाले, “पाकिस्तान सरकारने महापुराच्या या संकटाला गांभीर्याने घेतले नाही. दुसरीकडे वारंवार सांगूनही काही पर्यटक धोक्याच्या ठिकाणी गेले आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले. या समस्येकडे सरकार असेच दुर्लक्ष करीत राहिले, तर एक दिवस देशात मृत्यूचे तांडव येईल.”
हेही वाचा : Kamakhya Ambubachi Mela: कामाख्या देवीचे रक्तवस्त्र प्रसाद म्हणून का दिले जाते? इतिहास काय सांगतो?
पाकिस्तानची हरित निधीसाठी आंतरराष्ट्रीय मागणी
पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे हवामान बदलाशी लढण्यासाठी पुन्हा एकदा हरित निधीची मागणी केली आहे. विशेष बाब म्हणजे मे २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF)पाकिस्तानला ‘Resilience and Sustainability Facility’ (RSF) अंतर्गत १.४ अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की, हवामानसंबंधी उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ही मदत अपुरी आहे. पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री मुसद्दिक मलिक अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “मी याकडे हवामान बदलाचं संकट म्हणून पाहत नाही, तर हा न्यायाचा प्रश्न आहे. हरित निधीचे वाटप अतिशय एकतर्फी पद्धतीनं होतं आहे.” दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल फ्रेमवर्क करारामध्येही पाकिस्तानने हा मुद्दा जोरकसपणे मांडला आहे.