बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाली आहेत. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टी सुरू आहे. कमी दाब क्षेत्र मोसमी पाऊस सक्रिय होण्यास कसे महत्त्वाचे ठरते आणि पुढचे काही दिवस राज्यात पावसाची स्थिती काय असेल याचा आढावा.

कमी दाब क्षेत्र तयार झाल्यावर काय होते?

हवामानाच्या दाबाचा फरक असल्यामुळे आजूबाजूच्या भागातील जास्त दाबाची हवा कमी दाबाच्या भागाकडे वेगाने सरकते. त्यामुळे त्या भागात वाऱ्यांचा वेग वाढतो.समुद्र किंवा मोठ्या पाण्याच्या स्रोतांमधून बाष्पीभवन होऊन आर्द्र हवा वर चढते. हवा वर जाताना थंड होऊन ढग बनतात. ढगांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त झाल्याने मुसळधार पाऊस, गडगडाट, विजांचा कडकडाट होऊ शकतो. कमी दाब क्षेत्र जर समुद्रावर असेल तर पावसाचे प्रमाण जास्त असते.उष्णकटिबंधीय समुद्रावर कमी दाब क्षेत्र तयार झाले तर ते पुढे तीव्र होत ‘डिप्रेशन’, ‘डीप डिप्रेशन’ ही स्थिती संभवते आणि अनेकदा त्याचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकते.

कमी दाब क्षेत्र तयार होण्याची कारणे

जिथे तापमान जास्त असते तिथे हवा गरम होऊन हलकी (हलकी घनता असलेली) होते. ही हलकी हवा वर चढते आणि त्या जागेवर हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे “कमी दाब क्षेत्र” तयार होते. समुद्र, तलाव, नद्या किंवा दमट जमीन यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते. आर्द्र हवा अधिक हलकी असल्याने ती पटकन वर चढते आणि ढग तयार होतात.दिवसाच्या वेळी जमीन लवकर तापते. जमिनीवर हवा पटकन गरम होऊन वर चढते आणि तिथे कमी दाब तयार होतो. म्हणूनच मोसमी पावसाच्या हंगामात कमी दाब पट्टे तयार होतात. कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त उष्णता व आर्द्रता.

सध्याचे कमी दाब क्षेत्र राज्यासाठी फायदेशीर?

मान्सूनच्या उत्तरार्धात नुकतेच निर्माण झालेले पहिले कमी दाबाचे क्षेत्र हे आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या दरम्यान निर्माण झालेले आहे. म्हणजेच महाराष्ट्रासाठी अनुकूल स्थिती तयार झालेली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र जमिनीकडे सरकून गुजरातच्या दिशेने गेले तेव्हा त्यापाठोपाठ याच भागात दुसरे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे ही स्थिती महाराष्ट्रात पाऊस पडण्यास अनुकूल आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील काही दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडेल. सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. या क्षेत्राची वाटचाल २० ते २१ ऑगस्टपर्यंत गुजरातच्या दिशेने होईल. या दोन कमी दाब क्षेत्रांचा प्रवास मध्य भारतातून होत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात चांगला पाऊस पडेल.

कमी दाब क्षेत्रे महत्त्वाची का असतात?

कमी दाब क्षेत्रामुळे ढग तयार होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. भारतासारख्या कृषिप्रधान देशात यामुळे धान्य, सोयाबीन, कापूस, ऊस यांसारख्या पिकांसाठी पाणी मिळते. मान्सून काळात तयार होणारी बहुतेक कमी दाब क्षेत्रे शेतीच्या यशाचे प्रमुख कारण असतात. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे मान्सूनची लाट पुढे सरकते. त्यामुळे पाऊस केवळ किनाऱ्यावरच नाही तर विदर्भ, मराठवाडा, मध्य भारत, राजस्थान याठिकाणी पोहोचतो. नद्या, धरणे, तलाव हे प्रामुख्याने कमी दाब क्षेत्रातून निर्माण झालेल्या पावसामुळे भरतात. त्यामुळे वीज निर्मिती (हायड्रो पॉवर), पिण्याचे पाणी आणि सिंचन यासाठी महत्त्वाचे ठरते.

राज्यात पावसाची स्थिती काय?

पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. सर्वाधिक प्रभाव या कालावधीत कोकण आणि घाटमाथ्यावर होणार आहे. त्यामुळे या कालावधीत कोकण तसेच घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबईतही पुढील काही दिवस पाऊस सक्रिय असणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचे प्रमाण अधिक राहील. यामुळे पुढील चार ते पाच दिवस अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील आहे. काही वेळा २४ तासांत अधिक पावसाची नोंद देखील होईल. त्यामुळे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.