RAW Chief: भारत सरकारने गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW)च्या नवीन प्रमुखांचे नाव निश्चित केले आहे. १९८९ बॅचचे पंजाब कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी पराग जैन हे रॉचे पुढचे प्रमुख असतील. आज १ जुलैपासून ते पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते एव्हिएशन रिसर्च सेंटर (एआरसी)चे प्रमुख आहेत. त्यांना रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे पुढील कार्यकारी सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना ही जबाबदारी दोन वर्षांसाठी मिळाली आहे. याआधी या पदावर रवी सिन्हा कार्यरत होते. सिन्हा यांचा कार्यकाळ ३० जून २०२५ रोजी संपुष्टात आला. त्यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी भूमिका बजावली. तसेच पराग जैन यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी सैन्याशी संबंधित महत्त्वाची गुप्तचर माहिती एआरसीला दिली होती.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मोठी कामगिरी
आयपीएस पराग जैन यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानी सैन्याशी संबंधित बरीच गुप्त माहिती एआरसीला दिली होती. पराग जैन यांनी यापूर्वी चंदिगडचे एसएसपी (सुपरिटेंडेट ऑफ पोलिस), कॅनडा व श्रीलंकेत भारतीय प्रतिनिधी काम केले आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवाईतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळेच त्यांना दहशतवादाचा समूळ नायनाट करणारी व्यक्ती म्हणून ओळखले जाते.
त्यांच्या या कौशल्याचा फायदा नक्कीच ‘रॉ’ला घेता येईल, असे इतर तज्ज्ञांचे मत आहे.
एव्हिएशन रिसर्च सेंटरचे प्रमुख
पराग जैन हे एव्हिएशन रिसर्च सेंटरचे प्रमुखही होते. जैन यांची नियुक्ती ही भारतातील काही अत्यंत संवेदनशील सुरक्षेबाबतची परिस्थिती लक्षात घेता, करण्यात आल्याचे बोलले जात आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान गुप्तचर यंत्रणांचे नेतृत्व त्यांनी केले. या मोहिमेंतर्गत भारतीय सैन्याने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करीत ते उद्ध्वस्त केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांनी श्रीलंकेत पोस्टिंग करण्यापूर्वी कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादाविरोधात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर काही महिन्यांत जैन यांना जम्मू-काश्मीरमध्ये काही काळासाठी तैनात करण्यात आले होते. त्या काळात या ठिकाणी कडक सुरक्षेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. तसेच सुरक्षितता आणि स्थिरता निश्चित करण्यासाठी गुप्तचर कारवाया केल्या होत्या. पंजाब पोलीसमधील त्यांच्या कारकिर्दीत जैन यांनी चंदिगडचे एसएसपी आणि लुधियानाचे डीआयजी म्हणून काम केले. ते खूप धाडसी आणि चांगले अधिकारी असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले होते.
पराग जैन यांना दहशवादाविरोधातील तज्ज्ञ मानले जाते. त्यांना अफगाणिस्तान-पाकिस्तान प्रदेशांबाबत विशेष माहिती आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानमधील प्रदेशांवर लक्ष केंद्रित करून सीमापार दहशतवादी नेटवर्क डीकोड करण्यात त्यांची तज्ज्ञाची भूमिका भविष्यात रॉसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. जैन यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते मानवी बुद्धिमत्ता (HUMINT) आणि तांत्रिक देखरेख दोन्हीचा संतुलित पद्धतीने वापर करून गुप्तचर यंत्रणा अधिक प्रभावी बनवतात. सध्याच्या काळात भारताला पाकिस्तान आणि इतर शेजारील देशांकडून संभवणाऱ्या हायब्रिड धोक्यांना तोंड देण्यासाठी गतिमान नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि नेमकी अशाच वेळी जैन यांची नियुक्ती झालेली आहे.
ठळक मुद्दे :
- पराग जैन यांचे कुटुंब उत्तर प्रदेशातील कानपूर येथे राहते.
- १९८९ च्या बॅचचे पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी
- टेक्नॉलॉजी आणि दहशवादाविरोधातील रणनीती ही त्यांची वैशिष्ट्ये
- श्रीलंका आणि कॅनडामध्ये केले आहे काम
- ऑपरेशन सिंदूर, कलम ३७०, बालाकोट एअर स्ट्राइक या मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान
रिसर्च अँड एनालिसिस विंग (RAW) ही भारताची परदेशी गुप्तचर संस्था आहे. १९६८ पूर्वी इंटेलिजन्स ब्यूरो (IB) देशांतर्गत आणि बाहेरही गुप्तचर माहिती गोळा करत असे. मात्र, १९६२ च्या भारत-चीन युद्ध आणि १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर परदेशी गुप्तचर संस्थेला अधिक अचूकपणे माहिती गोळा करण्यासाठी वेगळ्या एजन्सीची गरज भासू लागली. मग ही गरज पूर्ण करण्यासाठी ‘रॉ’ची स्थापना करण्यात आली. भारताच्या सुरक्षेवर थेट परिणाम करणाऱ्या शेजारील देशांमधील घडामोडींवर लक्ष ठेवणे हे रॉचे सर्वांत महत्त्वाचे काम आहे.
भारताच्या सुरक्षेला धक्का लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर बारीक नजर
भारताच्या सुरक्षेचे आणि हिताचे रक्षण करण्यासाठी गुप्त कारवाया करणे हेदेखील रॉचे मुख्य कार्य आहे. त्याचप्रमाणे भारतासाठी धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादी संघटनांना निष्क्रिय करणे हेदेखील रॉच्या कार्यापैकी एक आहे. रॉ भारताच्या सुरक्षितता आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या इतर देशांमध्ये सक्रिय असलेल्या गटांची माहिती गोळा करते आणि त्यांना निष्क्रिय करण्याचे कामदेखील करते.
“पराग जैन हा एक चांगला अधिकारी आहे. तो एक मेहनती, व्यावहारिक व व्यावसायिक अधिकारी आहे”, असे जैन यांच्यासोबत काम केलेले १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी मोहम्मद मुस्तफा यांनी सांगितले. रॉच्या परंपरेनुसार, जैन यांची नियुक्ती एजन्सीच्या नेतृत्वात सातत्य दर्शवते. तिथे शांत कार्यक्षमता आणि क्षेत्रातील सखोल अनुभवावर लक्ष केंद्रित केले जाते. सरकारने जैन यांची ही निवड ज्येष्ठतेवर आधारित केल्याचे दिसून येते.