खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओ यांनी केला. भारताने कॅनडाचा आरोप फेटाळून लावताना हा आरोप मूर्खपणाचा आणि निरर्थक असल्याची टीका केली आहे. कॅनडाने निज्जरच्या हत्येचा आरोप केल्यानंतर रॉ च्या कॅनडातील केंद्र प्रमुखांची हकालपट्टी केली. त्यानंतर भारतानेही जशास तसे उत्तर दिले असून भारतातील कॅनडाच्या सहायक उच्चायुक्तांची मंगळवारी (१९ सप्टेंबर) हकालपट्टी केली. गेल्या काही महिन्यांपासून कॅनडा आणि भारत यांच्यामध्ये तणावाचे संबंध दिसत होते, त्याला आता नाट्यमय वळण लागले आहे. अवघ्या १० दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओ यांनी जी-२० परिषदेमध्ये परस्पर सहकार्यासंदर्भात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह चर्चा केली होती. तरीही कॅनडाने भारतीय उच्चायुक्तांवर कारवाई का केली? त्यामागची पार्श्वभूमी काय? याचा घेतलेला आढावा ….

ट्रुडेओ यांनी सोमवारी (१८ सप्टेंबर) काय म्हटले?

निज्जर कॅनडामधील सरे (Surrey) शहरातील गुरू नानक शीख गुरुद्वारा साहिबचा प्रमुख होता. १८ जून रोजी गुरुद्वाराच्या आवारात दोन अज्ञात हल्लेखोरांनी निज्जरवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. निज्जर हा खलिस्तान टायगर फोर्स (KTF) या बंदी घातलेल्या संस्थेचा म्होरक्या होता.

pakistan hit & run case accused natasha danish
Video: पाकिस्तानमध्ये हिट अँड रन; बड्या उद्योगपतीच्या मुलीला पीडित कुटुंबानं केलं माफ, कायद्याच्या कचाट्यातून सुटका!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
women raped in indore
Raped In Indore: महिलेला विवस्त्र करत मारहाण आणि बलात्कार, नृत्य करण्यास भाग पाडले; आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची काँग्रेसची टीका
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
Four police suspended, Khar, detaining person Khar,
खारमध्ये एका व्यक्तीला बेकायदेशिररित्या ताब्यात घेतल्याप्रकरणी चार पोलीस निलंबित
Shikhar Dhawan son Zoravar
Shikhar Dhawan : ‘आशा आहे की त्याला कळेल…’, निवृत्तीनंतर शिखर धवनचा मुलगा झोरावरसाठी भावनिक संदेश
Employees right not to work after office hours What would Australias Right to Disconnect law look like
कार्यालयीन वेळेनंतर काम न करण्याचा कर्मचाऱ्यांना अधिकार… कसा असेल ऑस्ट्रेलियातील ‘राइट टू डिस्कनेक्ट’ कायदा?
minor student raped by school bus driver in chandigarh
Chandigarh : संतापजनक! कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगडमध्ये शाळेच्या बस चालकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेओ यांनी सोमवारी (१८ सप्टेंबर) त्यांच्या संसदेत हरदीप सिंग निज्जर प्रकरणावर निवेदन केले. ते म्हणाले, “गेल्या काही आठवड्यांपासून कॅनडाच्या तपास यंत्रणा कॅनडाचे नागरिक निज्जर याच्या हत्येसंदर्भात भारताच्या सहभागाचा सखोल तपास करत होत्या. कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये जर परदेशी सरकारचा कोणताही सहभाग असेल तर आम्ही असा हस्तक्षेप सहन करणार नसून आमच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करू.”

हे वाचा >> विश्लेषण : कॅनडामध्ये ‘खलिस्तान’ चळवळ अजूनही का जिवंत?

जी-२० शिखर परिषदेदरम्यान त्यांनी कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येबाबतचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडून चिंता व्यक्त केली होती. यापुढेही या प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी भारत सरकारने कॅनडाला सहकार्य करावे, असे मी ठामपणे सांगत असल्याचेही ट्रुडेओ म्हणाले.

भारत सरकारने कॅनडाला कसा प्रतिसाद दिला?

कॅनडाच्या आरोपानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रत्युत्तर देताना म्हटले की, “आम्ही एक लोकशाहीवादी राष्ट्र असून कायद्याचा आदर राखण्यास बांधील आहोत. कॅनडात आश्रयास असणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी आणि कट्टरवाद्यांच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्याचा हा प्रयत्न आहे. खलिस्तानी भारताच्या सार्वभौमत्वाला आणि सामाजिक एकोप्याला थेट आव्हान देतात. या प्रकरणी कॅनडा सरकारकडून कारवाई न होणे, हा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित मुद्दा आहे. कॅनडातील राजकीय व्यक्तींनी खलिस्तानी व्यक्तींबाबत जाहीरपणे सहभावना व्यक्त केल्या आहेत, ही काळजीची बाब आहे. कॅनडामध्ये अशा बेकायदेशीर बाबी, हत्या, मानवी तस्करीसारख्या गुन्हेगारी गोष्टींना थारा मिळणे ही बाब नवीन नाही.”

तसेच आम्ही कॅनडा सरकारला त्यांच्या भूमीवर कार्यरत असलेल्या सर्व भारतविरोधी घटकांवर त्वरित आणि प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करत आहोत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले.

वाचा >> विश्लेषण: एअर इंडियाच्या विमानातील बॉम्बस्फोट ते ऑपरेशन ब्लू स्टार- खलिस्तानी चळवळीचा रक्तरंजित इतिहास

हरदीप सिंग निज्जर कोण होता?

निज्जर कॅनडाच्या सरे शहरात राहत होता. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिम कॅनेडियन प्रांतातील हे सर्वात मोठे शहर आहे. १९९७ साली त्याने पंजाबहून कॅनडात बस्तान हलवले. सुरुवातीला कॅनडामध्ये प्लम्बरचे काम केल्यानंतर निज्जर कॅनडामध्येच लग्न करून स्थायिक झाला, त्याला दोन मुले आहेत. २०२० सालापासून तो सरे शहरातील गुरुद्वाराचा प्रमुख होता. निज्जरचे मूळ पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील फिल्लोर तालुक्यातील भर सिंग पुरा या गावात आहे. करोना महामारीच्या पहिल्या लाटेपूर्वी निज्जरचे पालक या गावात येऊन गेले होते, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

खलिस्तान टायगर फोर्सशी निज्जरचे संबंध कसे आले?

भारत सरकारच्या माहितीनुसार, खलिस्तान टायगर फोर्सचा नेता म्हणून निज्जर संघटनेचे संचालन आणि नेटवर्गिंक करत होता. तसेच संघटनेच्या सदस्यांना प्रशिक्षण देणे आणि वित्तपुरवठा करण्यातही त्याचा सक्रियपणे सहभाग होता.

फेब्रुवारी २०२३ साली, केंद्रीय गृहमंत्रालयाने खलिस्तान टायगर फोर्स आणि इतर संघटनांना बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली (Unlawful Activities Prevention Act – UAPA) दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले. गृहमंत्रालयाने सांगितले, “केटीएफ ही एक अतिरेकी संघटना असून पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनरुज्जीवन करणे आणि भारताची प्रादेशिक अखंडता, एकता, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांना आव्हान देणे आणि पंजाबमधील महत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करून त्यांची हत्या करणे, तसेच दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे.”

हे ही वाचा >> विश्लेषण : भारताबाहेर खलिस्तानवादी तग धरून का आहेत? अन्य देशांच्या सरकारांची त्यांना फूस आहे का?

१९९५ साली पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिअंत सिंग यांच्या हत्येप्रकरणी भारतामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या जगतार सिंग तारा याची निज्जरने २०१३-१४ साली पाकिस्तानात भेट घेतली होती. तारा २००४ साली तुरुंगातून पळून गेला होता. मात्र, २०१५ साली त्याला थायलंडमधून अटक करून पुन्हा भारतात आणण्यात आले.

१९८१ साली भारतीय विमानाचे अपहरण करणाऱ्या पाच आरोपींपैकी एक असलेल्या दल खालसाचा नेता गजिंदर सिंग याच्यासोबतही निज्जर याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. गजिंदर सिंग सध्या पाकिस्तानात आहे.

हरदीप सिंग निज्जर शेवटपर्यंत खलिस्तानी चळवळीसाठी समर्पित होता. तो माझ्या मुलासारखा होता. काही वर्षांपूर्वीच आमची भेट झाली होती. त्यावेळी आमच्यातले प्रेम, विचार आणखी घट्ट झाले होते. तो एक सच्चा खलिस्तानी होता, अशी प्रतिक्रिया गजिंदर सिंग याने निज्जरच्या हत्येनंतर दिली होती.

हे वाचा >> विश्लेषण : पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांच्या हत्येपर्यंत गेलेली खलिस्तान चळवळ काय होती?

निज्जरच्या विरोधात कोणकोणते आरोप होते?

मागच्यावर्षी जुलै महिन्यात एनआयएने निज्जरवर दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते. २०२१ साली जालंधरमध्ये एका हिंदू पुजाऱ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निज्जरची अटक करण्यासाठी माहिती देणाऱ्यास सदर बक्षीस जाहीर केले होते. तपासादरम्यान आढळले की, निज्जरने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रक्षोभक भाषणे आणि आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले होते. त्याच्या भाषणामधून बंडखोरी निर्माण करण्यास उद्युक्त केले जात असल्याचे तपास यंत्रणांच्या निदर्शनास आले.

एनआयएच्या दस्तऐवजात म्हटले की, गोळा केलेल्या आक्षेपार्ह पुराव्याद्वारे हे सिद्ध होते की, निज्जर देशद्रोही आणि बंडखोर कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतातील विविध समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या कारस्थानात गुंतलेला होता. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी २०१८ साली ट्रुडेओ भारत भेटीवर आले असताना त्यांच्याकडे सुपूर्द केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीमध्येही निज्जर याचे नाव होते.