भारत उष्णकटिबंधीय देश आहे. देशात वेगवेगळी हवामान क्षेत्रे आहेत. हवामान विभागाकडून अंदाज जाहीर करताना प्रमुख नऊ प्रारूपांचा अभ्यास करून सारांश काढून अंदाज दिला जातो. प्रत्येक प्रारूपामध्ये काही त्रुटी आहेत. तसेच विविध प्रारूपांमधून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करताना अनेकदा मानवी चुकाही होण्याची शक्यता असते. प्रामुख्याने मुंबई, कोलकाता, चेन्नईसारख्या किनारपट्टीवरील मोठ्या शहरांचे इशारे चुकीचे ठरू नयेत; मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज चुकू नये, यासाठी अधिक काळजी घेतली जाते. बहुधा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असला तरीही मुसळधार पावसाचा अंदाज दिला जातो. यामागे प्रशासन, आपत्ती निवारण यंत्रणा सतर्क राहावी, असा उद्देश असतो. मागील काही वर्षांपासून हवामानाच्या अंदाजांमध्ये ८५ टक्के अचूकता आली आहे, जी पूर्वी ६० ते ६५ टक्क्यांवर होती.

अंदाज प्रक्रियेवर सरकारचा दबाव असतो?

मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज व्यक्त करताना बऱ्याचदा सरकारचा दबाव असतो. जनतेमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ नये, याची काळजी घेतली जाते. मे महिन्याच्या अखेरीस मोसमी पावसाचा दीर्घकालीन अंदाज व्यक्त करताना सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला तर महागाई वाढ, अन्नधान्यांचा काळाबाजार, साठेबाजीसारख्या घटना वाढण्याची शक्यता असते. पण, पाऊस, वादळ, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा आणि भूस्खलनासारखे अंदाज वर्तविण्याच्या प्रक्रियेवर सरकारचा दबाव असत नाही. हवामानाचा अंदाज चुकू नये, यासाठी पूर्ण खबरदारी घेतली जाते. दोन – तीन दिवस अगोदर अंदाज व्यक्त करण्यात अचूकता आली आहे. पण, मध्यम, दीर्घकालीन अंदाज व्यक्त करण्यात फारशी अचूकता आली नाही.

हेही वाचा…विश्लेषण : ग्रामीण भागांतील बँकांच्या कमतरतेमुळे असमतोल का वाढतो?

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आहे?

भारतीय हवामान विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तरीही नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. नजीकच्या भविष्यात हवामानाचा अंदाज व्यक्त करण्याच्या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भौगोलिक माहिती प्रणालीची (जीआयएस) भूमिका महत्त्वाची राहणार आहे. सध्या मुंबई किंवा पुणे शहरासाठी अंदाज दिला जातो. कृत्रिम बुद्धिमता आणि जीआयएस प्रणालीचा वापर केला तर भविष्यात मोठ्या शहरांचा उपनगरनिहाय अंदाज देणे शक्य होणार आहे. सध्या मुंबई, पुणे शहराला नारंगी इशारा दिला आणि शहराच्या कोणत्याही एका भागात मुसळधार पाऊस झाला तर हवामान शास्त्रानुसार तो अंदाज बरोबर आहे. संपूर्ण शहरात किंवा शहराच्या सर्वच भागांत मुसळधार पाऊस व्हावा किंवा झाला पाहिजे, असे नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर सुरू झाल्यानंतर अंदाजात अधिक अचूकता येईल. भारताच्या किनारपट्टीवर डॉप्लर रडार बसविण्यात आले आहेत. त्यामुळे तीन ते चार तासांचा अचूक अंदाज देणे शक्य झाले आहे. रडार प्रणालींमुळे वादळ, चक्रीवादळांचे अचूक अंदाज वर्तविले जात आहेत. पण देशाच्या मध्यवर्ती भागात अद्याप अपेक्षित प्रमाणात रडार बसविण्यात आलेले नाहीत.

ढगफुटीचा अंदाज वर्तविणे अशक्य का?

डॉप्लर रडारमुळे पुढील तीन – चार तासांचा अचूक अंदाज व्यक्त करता येतो. रडार ढगांची जमिनीपासूनची उंची, प्रत्यक्षात ढगांची उंची किंवा लाबी, रुंदी, आकारमान आणि ढगातील पाण्याचे प्रमाण या बाबत अचूक माहिती देते, त्यामुळे तीन – चार तासांचा अचूक अंदाज देणे शक्य झाले आहे. पण, अद्यापही ढगफुटी किंवा ढगफुटीसदृश पावसाचा अंदाज व्यक्त करणे शक्य झालेले नाही. त्यामुळेच हवामान विभागाकडून अद्याप तरी ढगफुटीचा अंदाज दिला जात नाही. कदाचित जीआयएस प्रणालीचा वापर सुरू झाल्यानंतर ढगफुटीचा अंदाज देणे शक्य होईल. ढगफुटी ही स्थानिक पातळीवर, ठरावीक भागापुरतीच आणि ठरावीक म्हणजे कमी कालावधीत घडणारी घटना असते. त्यामुळे ढगफुटीचा अचूक अंदाज देणे सध्या तरी शक्य होत नाही.

हेही वाचा…‘पर्यटकांनो, घरी जा!’ बार्सिलोनामधील स्थानिक लोक पर्यटकांवर पाण्याचे फवारे का मारत आहेत?

दमदार, चांगला मोसमी पाऊस कधी पडतो?

साधारण एक जूनपासून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशभरात मोसमी पाऊस दाखल होतो. मोसमी पाऊस देशाच्या भूभागावर सक्रिय होत असताना कमी – जास्त स्वरूपात पाऊस होत असतो. त्यानंतर दमदार मोसमी पावसाची प्रतीक्षा सुरू होते. पण, मोसमी पावसाची अरबी समुद्रातील शाखा आणि बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय होण्याची गरज असते. अरबी समुद्रातील शाखा सक्रिय होण्यासाठी पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची गरज असते. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळेच सध्या म्हणजे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टी, पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होत आहे. बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय होण्यासाठी बंगालच्या उपसागरात किंवा पूर्व किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती तयार होणे गरजेचे असते. तसेच या चक्रीय स्थितीची वाटचाल मध्य भारताच्या दिशेने पुढे सरकल्याशिवाय विदर्भासह मध्य भारतात चांगला पाऊस होत नाही. फक्त चक्रीय स्थिती निर्माण होऊन पाऊस पडत नाही. चक्रीय स्थितीची वाटचाल ज्या दिशेने होईल, त्या दिशेने बाष्पयुक्त हवा वाहत जाऊन पाऊस पडतो. त्यामुळे मोसमी पावसाच्या काळात पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरात किंवा पूर्व किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण होण्याची गरज असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

dattatray.jadhav@expressindia.com