दात किडू शकतील म्हणून केक, पेस्ट्री, चिप्स, बर्फी, पोहे, शिरा, पापड, नानकटाई.. अशी पदार्थाची मोठ्ठी यादीच आहारातून बाद करायची असे मुळीच नाही! दात किडण्याच्या भीतीने पदार्थ खाणेच टाळण्यापेक्षा ते खाण्याचा योग्य क्रम अवलंबणे चांगले. जेवताना सर्वात शेवटी मऊ, चिकट आणि पिठूळ पदार्थ खाल्ले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. गोड, मऊ आणि दातांवर चिकटून राहणाऱ्या पदार्थानंतर कडक, टणक, कुरकुरीत, जाडेभरडे आणि धागेदार स्वरूपाचे पदार्थ, फळे खाण्याचा नियम पाळणे आवश्यक. या पदार्थामुळे दाढांमध्ये चिकटलेले पदार्थाचे कण निघून जातात आणि दात स्वच्छ होतात.
इथे एक सोपी युक्ती सुचवावीशी वाटते, ती म्हणजे – आपण सॅलड म्हणून जेवणाच्या सुरुवातीला जे पदार्थ खातो म्हणजे गाजर, मुळा, काकडी, बीट इ. पदार्थापैकी गाजराचा- काकडीचा एखादा तुकडा शेवटपर्यंत शिल्लक ठेवून, जेवण्याच्या शेवटी चावून खाल्ला तर दात स्वच्छ होतात.
लेखाच्या या आधीच्या भागात उल्लेख केलेल्या मेहता काकांचे दात नामांकित ब्रँडची टूथपेस्ट वापरूनही किडले होते. कारण, टूथपेस्ट कुठल्या ब्रँडची आहे यापेक्षाही टूथब्रशचा वापर योग्य रीतीने केला जातोय का, हे अधिक महत्त्वाचे असते. मेहता काकांना नेमके हेच माहीत नव्हते! ब्रश भरून लांबलचक टूथपेस्ट घेऊन दात घासायला लागले आणि भरपूर फेस झाला की त्यांचे दात घासणे संपत असे. परिणामी तोंडात टूथब्रशची योग्य ती ‘अ‍ॅक्शन’ होतच नसे. ब्रश सर्व दातांतून योग्य रीतीने न फिरल्यामुळे अन्नाचे कण दातांत तसेच शिल्लक राहत आणि त्यामुळे त्यांचे दात किडायला निमंत्रणच मिळत असे. शिवाय काकांच्या ‘एक्झिक्युटिव्ह लाइफ स्टाईल’मध्ये ऑफिसच्या कामासाठी सतत हॉटेलमध्ये जेवणे अपरिहार्यच होते! अशा वेळी जेवणानंतर समोर आलेल्या ‘फिंगर बोल’मध्ये हातांची बोटे बुडवून साफ करण्यावरच त्यांचा भर असे. ज्या दातांच्या साहाय्याने आपण जेवतो, ते दात आणि तोंड जेवणानंतर पाण्याने खळखळून चुळा भरून साफ करावे लागतात हा सोपा नियम काका पाळतच नव्हते! त्यामुळेच त्यांचे दात किडले होते.
रात्री झोपण्याआधी, झोपायला कितीही उशीर झालेला असला, तरी ब्रश आणि पेस्टने दात घासून आणि भरपूर चुळा भरूनच झोपायला हवे. खूपच आळस आला असल्यास किमानपक्षी ओला टूथब्रश पेस्टशिवाय जरी सर्व दातांवरून ५-६ वेळा फिरवला, तरी कार्यभाग साध्य होऊ शकतो, हे लक्षात ठेवावे. असे केल्याने झोपेच्या काळात, दातात अडकलेले अन्नाचे कण दात किडवणार नाहीत. हा छोटा पण महत्त्वाचा नियम प्रत्येकानेच पाळायला हवा.
कुलकर्णी वहिनीही छोटय़ा रोहनला, तो जेव्हा हट्ट करेल तेव्हा लगेच चिप्स-चॉकलेट्स देत होत्या. कित्येकदा ‘न रडता शाळेत गेलास ना, तर तुला चॉकलेट’ अशी लालूचही दाखवत होत्या! रोहन खूप लहान असताना त्याला स्तनपान करण्याऐवजी त्यांनी बाटलीचेच दूध पाजले होते. अपवादात्मक प्रसंगांमध्ये बाळाला बाटलीने दूध पाजणे वेगळे आणि बाळ रडू नये म्हणून कित्येकदा झोपेतही त्यांच्या तोंडात दुधाची बाटली अक्षरश: कोंबून त्याला झोपवणे वेगळे! कुलकर्णी वहिनींनी नेमकी हीच गोष्ट केली होती.
दुधाच्या बाटलीतले साखर घातलेले दूध बाळाच्या तोंडात तसेच साचून राहते. झोपेतही दुधाची बाटली तोंडात तशीच शिल्लक राहिली, तर दातांभोवती जमा झालेले साखरयुक्त दूध दात किडण्याला कारणीभूत ठरते. यालाच ‘मिल्क बॉटल सिंड्रोम’ असे म्हणतात.
बिस्किटे-गोळ्या-चॉकलेटांच्या अतिरेकामुळेही लहान मुलांचे दात मोठय़ा प्रमाणात किडतात. पण गंमत अशी आहे, की लहान मुलांना गोळ्या, चॉकलेटांची ओळख मोठी माणसेच करून देत असतात. कुणाच्या घरी पाहुणे म्हणून जाताना, वाढदिवसाला वर्गात वाटण्यासाठी किंवा मुलाला काही लालूच दाखवण्यासाठी अशा विविध सबबींखाली मोठी माणसेच लहान मुलांना गोळ्या, चॉकलेट, बिस्किटं देत राहतात.
गोळ्या-चॉकलेटांबाबतीत काही सोपे नियम पाळायलाच हवेत. चिकट आणि गोड चॉकलेट दातात अडकून, चिकटून बसल्यावर दात किडणारच. त्यासाठीच चॉकलेट खाल्ल्यानंतर दात साफ करायला हवेत. इथे पुन्हा पूर्वीचाच नियम – गोळ्या- चॉकलेट खाल्ल्यानंतर लहान मुलांना कच्च्या फळांच्या एक- दोन फोडी खाण्याचीही सवय लावावी.
चॉकलेट खाण्याच्या वेळाही पाळणे महत्त्वाचे आहे. रात्री जेवल्यानंतर वा जेवणाच्या शेवटी चॉकलेट कधीच देऊ नये. अन्यथा ते रात्रभर दातांवर तसेच अडकून राहते आणि दात किडायला कारण मिळते. तरीही रात्री चॉकलेट खायचेच असल्यास ‘एका हातात चॉकलेट, तर दुसऱ्या हातात ब्रश-पेस्ट!’ हा नियम पाळावा.
लहान मुलांच्या बाबतीत जशी चॉकलेट खाण्याची सवय कधी-कधी व्यसनात बदलू शकते, तशीच तरुण पिढीच्या बाबतीत शीतपेयांची म्हणजे एअरेटेड कोल्ड-ड्रिंक्सची सवय व्यसनात बदलू शकते. सर्व प्रकारच्या शीतपेयांत खूप साखर तर असतेच पण त्याशिवाय काही अ‍ॅसिड्सही असतात. अ‍ॅसिडमुळे दातांचे इनॅमल झिजते. इनॅमलला बारीक बारीक छिद्रे पडतात. इनॅमलचा थरच कमकुवत झाल्यावर दात किडण्याला संधी मिळते.
शीतपेयांमुळे दातांचे असे नुकसान होऊ नये म्हणून सर्वप्रथम शीतपेयाची सवय व्यसनात रूपांतरित होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबरोबर एक व्यावहारिक युक्ती अशी, की शीतपेये स्ट्रॉच्या साहाय्यानेच प्यावीत. असे केल्यामुळे त्यांचा दातांशी येणारा संपर्क कमी होतो.
जेवण झाल्यानंतर भारतात तसेच आशिया खंडातील अनेक देशांत मुखशुद्धी म्हणून काही ना काही खाण्याची किंवा चघळण्याची सवय आढळते. मुखशुद्धीच्या नावाखाली पान, सुपारी, बडीशेप, धनाडाळ या पदार्थाबरोबरच विविध सुगंधी सुपाऱ्यांची बारीक पावडर, पानमसाला, मावा, गुटखा, तंबाखू.. ही यादी व्यक्तिगणिक बदलत राहते. खरं तर जेवण झाल्यानंतर एकदा चुळा भरून दात साफ केले की काहीही खाऊच नये म्हणजे दात चांगले राहतात. पण अनेक जण तोंडाला चांगला वास, चांगली चव यावी म्हणून, अन्नाचे नीट पचन व्हावे म्हणून आणि कित्येक जण ‘सवयीचा गुलाम’ म्हणूनही असा ‘मुखवास’ चघळत असतात.
पानाचा विडा खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते, रक्तात लोहवृद्धी होते. पण पान खाल्ल्यानंतर पानाचा चोथा हिरडी व दातात कुठे कुठे अडकून राहतो आणि हिरडय़ांचे आजार होऊ शकतात. पानामध्ये अनेक जण चुना, कात, सुपारी, मावा, गुटखा, तंबाखूही घालतात. मावा, गुटखा, तंबाखूमुळे कर्करोग होऊ शकतो. ‘ओरल सबम्युकस फायब्रोसिस’ नावाचा कर्करोगसदृश आजार झाल्यास तोंड उघडणे कमी कमी होत जाते.
मुखशुद्धी म्हणून त्यातल्या त्यात खायचेच झाल्यास जाडय़ाभरडय़ा स्वरूपाची बडीशेप आणि ओवा असे मिश्रण खाण्यास हरकत नाही. जाडय़ाभरडय़ा बडीशेपेचे दातांशी घर्षण होऊन, भरपूर लाळ सुटून दातात चिकटलेले अन्नाचे कण निघून जातात. ओव्यामुळे अन्नाचे पचनही नीट होते. बरेच जण जेवणानंतर चुइंगगम चघळतात. चुइंगगम दातात चिकटून बसत नाही. सतत चावत राहिल्यामुळे भरपूर लाळ सुटून दातात चिकटलेले अन्नाचे कण निघून जातात. ‘शुगर फ्री चुइंगगम’मुळे साखरेचाही प्रश्न आता उरलेला नाही. मात्र, चुइंगगमचा एक विचित्र परिणाम असा होऊ शकतो, की बारीक सारीक मानसिक ताण आला तरी चुइंग खाण्याची सवय जडते. त्यामुळे जेवणानंतर शक्यतो काहीही न खाणे आणि काही खाल्ले गेले, तर भरपूर पाण्याने खळखळून स्वच्छ चुळा भरणे हे काटेकोरपणे पाळावे.
थोडक्यात आपल्या दातांचे आणि हिरडय़ांचे खराब होणे आपल्या आहाराच्या सवयींवर खूपच अवलंबून आहे. म्हणूनच आहारातील काही चुकीच्या गोष्टी टाळल्यास आणि वर सांगितलेले काही छोटे नियम आणि युक्तया वापरल्यास आजच्या बदललेल्या आहार संस्कृतीतही दाताचे आरोग्य नीट राखता येईल!(समाप्त)

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
gold and silver Pani Puri
सोने-चांदीची पाणी पुरी! मोदींच्या गुजरातमधील या पाणी पुरीची एकच चर्चा; व्हायरल VIDEO एकदा पाहाच
Keep the onion in in hot water before chopping it
Video : कोमट पाण्यात कांदा ठेवा अन् पाहा कमाल! भन्नाट किचन टिप्स वापरून बघा