कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथे उद्या शनिवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या युवा एल्गार मेळाव्याचे आयोजन केले असताना पूर्वसंध्येला पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी नेत्यांचा अबोला लक्षवेधी ठरला. पक्षांतर्गत गटबाजीचा प्रश्नाला शिताफीने टाळण्यात आले. त्यामुळे मेळाव्याला येणाऱ्या नेत्यांना स्थानिक गटबाजीचा त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

गेल्या चार वर्षांत भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वसामान्य जनतेसह युवकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यासंदर्भात युवकांत जनजागृती करण्यासाठी शनिवारी युवा एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी अजित पवार, माजी मंत्री शशिकांत शिंदे मार्गदर्शन करणार आहेत,  अशी माहिती आमदार मुश्रीफ यांनी दिली.

राज्यातील तरुणांच्या मनामध्ये या सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे. या तरुणांना एकत्रित करून जनजागृती करण्यासाठी यापुढच्या काळात युवा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात उस्मानाबाद,जळगाव,अमरावती, ठाणे येथे विभागवार युवकांचे मेळावे घेण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात युवा एल्गार मेळावा घेण्यात आला आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम गोते पाटील यांनी सांगितले. जिल्हा अध्यक्ष ए .वाय. पाटील,आर के पोवार,राजेंद्र पाटील यद्रावकर, अनिल साळोखे उपस्थित होते.

मुश्रीफ — महाडिक गटबाजीचा पीळ कायम

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने दुबईवारीवरून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केलेली टीका बँकेचे अध्यक्ष, आमदार मुश्रीफ यांना बोचली होती. त्यामुळे महाडिक यांच्यावर १० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केल्याची माहिती दोन दिवसात पत्रकारांना देणार असल्याचे विधान करत  मुश्रीफ यांनी लोकसभेसाठी इच्छुक असलेले खासदार धनंजय महाडिक त्यांच्यासमोरच गटबाजीचा पीळ कायम असल्याचे अधोरेखित केले. खासदार महाडिक उशिरा पोहचले. त्यांनी मुश्रीफ, निवेदिता माने यांना लवून नमस्कार केला पण मुश्रीफ यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उभय नेत्यांमध्ये संवादही झाला नाही.