23 September 2020

News Flash

शेतकरी संघटनेची स्वाभिमानाची तलवार म्यान

अलीकडे शेट्टी यांनी शासनाच्या धोरणावर कडाडून टीका सुरू केली आहे.

स्वाभिमानाची भाषा करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता आपली स्वाभिमानाची तलवार म्यान केली असे वाटण्यासारखी तडजोड या पक्षाने चालवली असल्याचे दिसत आहे . ‘जिथे पिकेल तिथे पेरायचे’ अशा चाणाक्ष शेतकऱ्याची व्यवहार्य भूमिका अवलंबायला स्वाभिमानीने सुरुवात केली आहे. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी यांनीही अन्य पक्षाप्रमाणे सोयीच्या सोयरिकीला महत्त्व दिले आहे. भाजपच्या विरोधातील शेट्टी यांचा हुंकार कायम आहे, असे म्हणावे तर काही तालुक्यात, विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपशी गट्टी केली आहे. त्यामुळे त्यांचेच ‘भाजपशी  मत्रीपूर्ण लढतीचा  आडपडदा कशाला, असला दांभिकपणा आपल्याला जमत नाही’, असे उद्गार हवेत मिसळले आहेत. आपलेही पाय मातीचेच असल्याचे शेट्टी दाखवून देत आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाया हाच मुळी शेतकरी वर्ग आहे. त्यातही ऊस-दूध उत्पादक वरच्या पातळीवर. कोल्हापूर-सांगली या जिल्’ाात संघटनेची बीजे चांगलीच रुजली आहेत. खुद्द राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झालेले. कोल्हापुरातील ४ तालुके आणि सांगली जिल्’ाातील वाळवा, शिराळा हे आणखी २ तालुके मिळून त्यांचा मतदारसंघ बनलेला. त्यांच्याच पाठबळामुळे कृषी राज्यमंत्री बनलेले सदाभाऊ खोत हे शिराळा तालुक्यातील. पण याच मतांची सुपीक बेगमी करणाऱ्या शेट्टी यांची यावेळची राजकीय चाल मुत्सद्दीपणाची साक्ष देणारी, तद्वत सरभेसळ भूमिकेमुळे नेमका अंदाज न देणारी. यास्तव जिल्हा परिषद निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणारे यश नेमके किती, शेट्टी यांचे व्यूहात्मक राजकारण कोणत्या दिशेचे, भाजपशी अंतर राखतानाच काही ठिकाणी जुळवून घेण्याची मानसिकता कोणती, मोदींसह भाजपवर शेट्टी जाहीरपणे आगपाखड करणार याचा अंदाज असतानाही त्यांच्याशी जमवून घेण्यामागील भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा मतलब कोणता, सदाभाऊ खोत यांना िखडीत पकडण्यासाठी शेट्टी समर्थकांत नेमके काय शिजतेय? अशा अनेक प्रश्नाचा फेर निर्माण झाला आहे. यावर राजकीय वर्तुळात जशी चर्चा आहे तशीच स्वाभिमानीच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.

भूमिका शेट्टी – सदाभाऊंची

अलीकडे शेट्टी यांनी शासनाच्या धोरणावर कडाडून टीका सुरू केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, या मागणीवरून त्यांनी राज्य नव्हे तर देशभर वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. एकीकडे सदाभाऊ हे सरकारी धोरणाची भलामण करत असताना शेट्टी यांची सत्ताधाऱ्यांवरील जहरी टीका स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना बुचकळ्यात टाकणारी आहे. याच वातावरणात हा पक्ष ग्रामीण भागातील आपल्या ताकदीचा अंदाज या निवडणुकीत घेत आहे.  स्वाभिमानीशी युती करण्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोराचे प्रयत्न करूनही शेट्टी यांनी भाजपला ‘तुमचे आमचे जमणार नाही’ असे ठणकावून सांगितले आहे. आता प्रचाराची राळ उठवताना शेट्टी यांचा सातबारा कोरा करण्याच्या मुद्दय़ावरून आवाज आणखीनच वाढीस लागला आहे. लवकरच प्रचारात सदाभाऊंना उतरवले जाणार आहे. तेव्हा ते शेट्टी यांच्या सुरात सूर मिळवणार की त्यांच्या देखत सरकारी धोरणाचे कौतुक करणार हा खरा प्रश्न आहे. म्हणजे एकाच मंचावर शेट्टी सरकारवर तोंडसुख घेताहेत आणि सदाभाऊ तोंड भरून स्तुती करताहेत, असे विरोधाभासी चित्र पाहायला मिळेल. यामुळे बळीराजासह ग्रामीण भागातील मतदार आणखीनच गोंधळून जाणार असून या वर्तणुकीचे स्वाभिमानी अंतर्गत भलते परिणाम होण्याची शक्यता आहे.

शेट्टींच्या सोयीच्या सोयरिकी

भाजपचा मत्रीपूर्ण लढतीचा पर्याय नाकारणाऱ्या शेट्टी यांनी  आमदार अमल महादेवराव महाडिक यांच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपशी युती केली आहे. याला स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचा मुलामा दिला आहे. मात्र, शेट्टी यांना महादेवराव महाडिक यांच्याकडून मिळणारी रसद याला कारणीभूत असल्याची चर्चा उघडपणे रंगली आहे. स्थानिक आघाडीचा मुद्दाच रेटत त्यांनी शिवसेना (कागल), हातकणंगले (काँग्रेस), चंदगड (चंदगड तालुका विकास आघाडी – भाजपसमवेत),  भाजप (शिराळा), राष्ट्रवादी विरोधी सर्वपक्षीय आघाडी (वाळवा) अशा सोयीच्या सोयरिकी केल्या आहेत . शेट्टी यांच्या राजकारणाचा बदलता पोत लक्षात घेता या तडजोडी लोकसभा निवडणुकीला सोयीच्या ठराव्यात असा त्याचा अर्थ असल्याचे मानले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:43 am

Web Title: raju shetti swabhimani shetkari sanghatana
Next Stories
1 अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाच्या वाटय़ाला निराशा
2 निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कोल्हापुरात गुंडांवर कारवाई
3 कोल्हापुरात सर्वच पक्षांमध्ये गोंधळ; छुपी आघाडी आकाराला येण्याची चिन्हे
Just Now!
X