गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्याआधारे तुमचा आशीर्वाद घेऊ न सत्ता आल्यावर पुन्हा महालक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायला येतो, अशी भावनिक साद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कोल्हापूरकरांना घातली. कोल्हापूरकरांना परत महापुराचा त्रास होऊ  देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे मंगळवारी कोल्हापुरात आगमन झाले. या यात्रेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यात्रेचे जागोजागी स्वागत करण्यात आले. यासाठी शहरात दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रा मार्गावर कोल्हापूरजवळील कळंबा भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश देसाई, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, गोकुळचे संचालक बाबा देसाई उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. स्थानिक टोलमुक्तीचा केलेला संकल्प पूर्ण केला. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या महालक्ष्मी तीर्थस्थळाचा विकास करण्यासाठी आराखाडय़ाला मंजुरी दिली. आता त्याचे काम गतीने होईल. जगाशी संपर्क साधण्यासाठी विमानतळ विस्तारीकरणाचे काम केले. आपल्याला पुराचा त्रास झाला. मात्र इथून पुढे हा त्रास होणार नाही, याचीही दक्षता घेणार आहे. त्यासाठीचा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल. आपला जनादेश घेऊ न मुंबईला जाणार आहे. विधानसभेवर पुन्हा महायुतीचा झेंडा फडकवणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

रॅलीला मोठा प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहाटे औरंगाबाद येथे गेले होते. येथील कार्यR म संपवून त्यांचे सकाळी साडेअकराच्या सुमारास कोल्हापूरच्या ताराराणी चौकात आगमन झाले. येथून त्यांच्या रॅलीला प्रारंभ झाला. शहरातील पंचशील हॉटेल, दसरा चौक, शिवाजी चौक, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, उमा टॉकीज, हॉकी स्टेडियम, कळंबा, बिद्री, मुदाळतिट्टा, राधानगरी या मार्गावरून ही रॅली सिंधुदुर्गकडे रवाना झाली. या मार्गावर काढलेल्या दुचाकी रॅलीला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती या वेळी होती. मार्गावर जागोजागी मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

महाजनादेश यात्रेवेळी फडणवीस यांचा आमदार अमल महाडिक यांनी चांदीची गदा देत सत्कार केला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी महाडिक यांच्या विकासकार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. ते म्हणाले,महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर शहराचा आणि दक्षिण मतदार संघाचा विकास होऊ न जनतेचे प्रश्न मार्गी लागले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मंगळवारी कोल्हापुरात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यात्रेचे जागोजागी स्वागत करण्यात आले. यासाठी शहरात दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.