कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे नवनियुक्त शहरप्रमुख हर्षल सुर्वे यांनी सोमवारी ठाकरेगटाला जय महाराष्ट्र करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेवून हा पक्षप्रवेश मुंबई येथील मुक्तगिरी या शासकीय निवासस्थानी घडवून आणला.
सुर्वे हे गेले २५ वर्षे शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत. युवा सेना जिल्हाप्रमुख, रायगड जिल्हा विस्तारक, कोल्हापूर जिल्हा विस्तारक या पदावर काम केले आहे. शहर समन्वयक या पदावर काम करत होते. नुकतीच त्यांना ठाकरे गटामध्ये शहरप्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती.
वादाची परिणीती
शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावर रविकिरण इंगवले यांची निवड झाली. नाराज झालेले स्पर्धेतील युवा सेनेचे जिल्हाधिकारी सुर्वे यांनी या निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा निर्णय मान्य करून काम करावे, असे म्हटले होते. त्यानंतर सुर्वे यांनी पदाचा राजीनामा देत आज मुंबई गाठली होती.
ठाकरे गटाला धक्का
आमदार राजेश क्षीरसागर, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन हर्षल सुर्वे, उपशहरप्रमुख अर्जुन संकपाळ, इंद्रनील पाटील, प्रदीप हांडे, जयाजी घोरपडे, संकेत खोत, देवेंद्र सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.