मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा कट

नवी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा कट आखून त्याप्रमाणे हल्ला केल्याबद्दल आंतरराज्य पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याला शहापूर पोलिसांनी आज अटक केली. या प्रकरणातील संशयित स्वप्निल फातले याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

आर्थर रोड जेलमध्ये असलेला बिल्डर सुरेश बिजलानी याच्या खुनाची सुपारी मनीष नागोरी याने घेतली होती. त्याने ही कामगिरी स्वप्निल फातले याच्यावर सोपविली होती. पण २६ सप्टेंबर रोजी शहापूर पोलिसांनी संशयावरून फातले याला ताब्यात घेतले असता हे प्रकरण उघडकीस आले होते. तर नागोरी हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. तेव्हापासून फरार नागोरीचा पोलिस शोध घेत होते.

मनीष नागोरी हा एका गुन्ह्य़ात ठाणे कारागृहात असताना त्याची ओळख विनोद नावाच्या क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या मुख्य बुकीबरोबर झाली होती. विनोद हा छोटा राजन टोळीशी संबंधित होता. विनोद याची नवी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक सनी लाहोरिया यांच्याशी घनिष्ठ मत्री होती. दरम्यानच्या काळात सनी याचे वडील सुनील लाहोरिया यांची हत्या झाली. त्या हत्येमध्ये बांधकाम व्यावसायिक बिजलानी याचा हात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने सनी हा बिजलानीवर चिडून होता. त्याने या संदर्भात विनोद याला माहिती दिली होती. तर विनोदने बिजलानी याच्या हत्येची सुपारी कोल्हापूर भागातील शूटर्सना देण्याचा डाव आखला होता. त्यासाठी विनोद व सनी यांनी यड्राव परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये मनीष नागोरी याच्याशी पहिली बठक केली. त्यामध्ये हत्येची सुपारी पक्की होऊन नागोरी यास दहा लाख रुपये अ‍ॅडव्हान्स दिले होते. दरम्यानच्या काळात विनोद याचा मृत्यू झाल्याने सनीने नागोरी याच्याशी थेट संपर्क ठेवला होता. सनी हा मनीषला प्रत्येक भेटीवेळी नवीन हॅन्डसेट व सीमकार्ड वापरण्यास देत होता. त्यावरून तो सनी याच्याशी संपर्क करीत होता. दरम्यानच्या काळात बिजलानी याच्यावर प्राणघातक हल्ला झाला; पण तो त्यातून सुदैवाने बचावला.

या घटनेबाबत संशयावरून ताब्यात घेतलेल्या स्वप्निल याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन मॅगझिन, आठ जिवंत काडतुसे आणि रोख दहा हजार रुपये असा १ लाख २१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत बांधकाम व्यावसायिक बिजलानी याच्या खुनाची सुपारी घेतल्याचे उघड झाले होते. ही सुपारी मनीष नागोरी याने घेतली असून त्यासाठी पिस्तूल दिले असल्याचे त्याने सांगितले. बिजलानी एका तारखेसाठी न्यायालयात नेण्यात येणार होते. त्या वेळी त्याच्यावर हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याचे फातले याने सांगितले होते.