ऊस शेतीच्या माध्यमातून शिरोळ तालुका हा राज्यातील सर्वाधिक कर्करोग रुग्णांचा जिल्हा बनला आहे, असे विधान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी त्या विरोधात जोरदार आक्षेप नोंदवला आहे.पुणे येथे काल राज्यस्तरीय नैसर्गिक शेती परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील मुबलक उसाचे पीक घेतले जाते. त्यासाठी पाणी, रासायनिक खत याचा मुबलक वापर केला जातो. त्याचे घटक हळूहळू पाण्याच्या स्त्रोतांत मिसळले जातात. हे पाणी पिल्याने शिरोळ तालुक्यात राज्यात सर्वाधिक कर्करोगाचे रुग्ण आढळतात.

याला जोरदार आक्षेप घेतला जात आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी , चंद्रकांत पाटील यांनी असे विधान करण्यापूर्वी राहुरी कृषी विद्यापीठात शिकवणी घ्यावी किंवा रेशीम बागेत जाऊन एखादा लघुकालीन अभ्यासक्रम शिकावा,असा टोला लगावला. पंचगंगा नदीमध्ये औद्योगिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे पाणी पिण्यात वापरल्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या रुग्णांना कर्करोग झाला आहे. दूधगंगा ,वारणा, कृष्णा नदीकाठी कर्करोगाचे प्रमाण कमी आहे. हे रायचूर विद्यापीठातील जागतिक स्तराच्या प्रयोगशाळेत तपासणीत दिसून आले आहे, हे मंत्र्यांनी समजून घ्यावे,अशी टीका त्यांनी केली.

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी, आमच्या संघटनेने अनेक गावात कर्करोगा बाबत पाहणी केली असता मंत्र्यांनी केलेले विधान असत्य असल्याचे दिसून आले आहे. अनुभव नसलेल्या विषयावर पाटील यांनी विधान करू नये, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिरोळ तालुक्यातील शिवसेनेच्या युवा आघाडीचे उपप्रमुख वैभव गुजरे यांनी शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत ही अफवा आहे. अशा प्रकारे मंत्र्यांनी विधाने केल्याने तालुक्यातील शेतीकडे संशयाने बघितले पाहिले जात असून त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे,असा आरोप केला.