News Flash

सर्वाच्या नजरा युवराज सिंगकडे!

न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निभ्रेळ यश मिळविल्यानंतर भारतीय ‘अ’ संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या

| September 15, 2013 06:03 am

न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत निभ्रेळ यश मिळविल्यानंतर भारतीय ‘अ’ संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. रविवारी होणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्याला सामोरे जाताना सर्वाच्या नजरा असतील त्या अर्थातच युवराज सिंगकडे.
उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवडय़ात भारत ‘अ’ संघाने न्यूझीलंडला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ३-० असे हरवले. भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी धडपडणारा युवी या संघाच्या नेतृत्वाची धुरा कशा प्रकारे सांभाळतो, याकडे सर्वाचे लक्ष असेल. कर्करोगावर मात करून पुन्हा मैदानावर परतणारा युवराज या संधीकडे गांभीर्याने पाहत आहे.
चेंडूला वेगाने दूरवर फटकावण्याची नजाकत जोपासणारा युवराज कसोटी क्रिकेटपेक्षा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अधिक सक्षमपणे खेळतो. युवराजच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध भारत ‘अ’ संघाच्या विजयात उन्मुक्त चंदने चमकदार कामगिरी दाखवली होती. त्याने ४८च्या धावसरासरीने एकूण १६४ धावा केल्या. यात सर्वाधिक ९४ धावांचा समावेश होता. याशिवाय अन्य सलामीवीर रॉबिन उथप्पानेही शानदार शतक झळकावले. भारतीय युवा संघाला विश्वविजेतेपद मिळवून देणारा चंद आणि भारतीय संघाची दारे ठोठावणारा उथप्पा राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्नशील असतील.
याचप्रमाणे केदार जाधव आणि मनदीप सिंग यांच्याकडून मधल्या फळीत जबाबदारीपूर्ण अपेक्षा आहेत. मागील मालिकेत जाधवने सातत्यपूर्ण फलंदाजीचे प्रदर्शन करीत अनुक्रमे ३०, ३७ आणि ५७ धावा केल्या होत्या. महाराष्ट्राच्या या गुणवान फलंदाजालाही आपला ठसा उमटवायचा आहे.
ताकदवान व आक्रमक फटकेबाजीसाठी विशेष ओळखला जाणारा युसूफ पठाण २०११च्या विश्वचषकानंतर लक्ष वेधू शकला नव्हता. निवड समितीने या निमित्ताने त्याला आणखी एक संधी दिली आहे. जयदेव उनाडकट, सिद्धार्थ कौल व आर. विनय कुमारवर भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा असेल.
किरॉन पॉवेलच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा युवा संघ भारतीय वातावरणात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. उपकर्णधार वीरसॅमी परमॉल, आंद्रे रसेल, आंद्रे फ्लेचर, डेव्हॉन थॉमस, किर्क एडवर्ड्स, निकिता मिलर आणि नरसिंग देवनरिन यांच्यावर विंडीजची मदार असेल.
प्रवीण, इरफानची माघार
वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार आणि इरफान पठाण यांनी दुखापतीच्या कारणास्तव भारत ‘अ’ संघातून माघार घेतली आहे. रविवारपासून वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्ध अनधिकृत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. या दोघांच्या जागी अनुक्रमे सिद्धार्थ कौल आणि आर. विनय कुमार यांचा संघात समावेश करण्यात आला आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले. याचप्रमाणे दुसऱ्या आणि तिसऱ्या चारदिवसीय सामन्यांसाठी केरळचा फलंदाज व्ही. जगदीशचाही भारतीय ‘अ’ संघात समावेश करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 6:03 am

Web Title: all eyes on yuvraj singh as india a take on west indies a
टॅग : India A,Yuvraj Singh
Next Stories
1 मी निर्दोष!
2 झिम्बाब्वेचा पाकिस्तानला ‘दे धक्का’!
3 विश्वचषकासाठी हॉकी संघ निवडताना ओल्टमन्स यांना स्वातंत्र्य द्यावे -काव्‍‌र्हालो