डॉ. प्रकाश परांजपे

मेननला गणितात गती होती. ज्येष्ठदेवाचा मल्याळम ग्रंथ गणित-युक्तिभाषा त्याने कोळून प्यायला होता. न्यूटन आणि लीबनिझ त्यातूनच कॅलकुलस शिकले असं तो तावातावानं म्हणायचा. १३ दस्तांचा  प्रश्न मेनननं चुटकीसरशी सोडवला. सहा किलवर, चौकट-बदाम एक्का-राजा यांचे दोन दोन असे चार, आणि इस्पिक एक्का मिळून ११ नगद दस्त होते. उरलेले दोन जिंकण्यासाठी त्याने एक योजना बनवली.

जाधवने किलवर दुरीची उतारी केली होती. त्यामुळे पहिला दस्त मेनन  कि२-कि३-कि९-कि१० असा  स्वस्तात जिंकला. दुसऱ्या दस्ताला किलवर एक्का खेळून मेनननं हुकमाच्या पानांचा मागोवा घेतला. त्याच्याकडे ६ अधिक भातखंडेचे ३ असे ९ हुकूम ठेकेदारीत होते, तर उरलेले ४ गावात होते. किलवर एक्क्यावर उ-द दोघांनीही किलवर पान दिलं असतं तर गावातले हुकूम संपले असते आणि खेळ थोडा सोपा झाला असता, पण दक्षिणेला बसलेल्या आबांनी त्यावर चौकट तिरी जाळली. ‘बघ्या’ भातखंडेच्या चेहऱ्यावर थोडी काळजीची रेषा उमटली, पण मेनन तयार होता, आणि डावाची सूत्रं त्याच्या हातात होती.

तिसऱ्या दस्ताला त्याने इस्पिक राणी लावली. जाधव निर्विकारपणे छोटं पान  खेळला. मेनननं बघ्याच्या हातातून एक्का खेळून तो दस्त जिंकला. पुढच्या दस्ताला मेनननं इस्पिक तिरी खेळून किलवर राजानं मारती घेतली. कुणी सांगावं, जाधवच्या हातात जर दुसरं इस्पिकचं पान नसतं तर त्याला वरमारती घ्यायची  संधी देणं धोक्याचं होतं. पण आबा आणि जाधव या दोघांनीही या दस्ताला एक-एक इस्पिकचं पान दिलं आणि मेननची कळी  खुलली.

पुढच्या दस्ताला छोटं किलवर खेळून राणीने दस्त जिंकून  मेनन ‘बघ्या’च्या हातात ‘पोचला’ आणि त्याने आणखीन एक इस्पिकचं पान लावून हुकमाने मारती घेतली. त्यानंतर चौकट एक्का खेळून आणखीन एकदा ‘बघ्या’च्या हातात जाऊन मेनन इस्पिक खेळला आणि हातातल्या शेवटच्या उरलेल्या हुकमानं मारती घेऊन तो दस्त जिंकला. यावर जाधवचा राजा पडला. भातखंडेच्या हातातली उरलेली दोन इस्पिकची पानं आता ‘सर’ झाली होती, विजेतेपदाला पोचली होती. बदाम राजाद्वारे त्या हातात पोचून मेनननं ती वाजवली आणि ७ किलवरचा ठेका वटवला!

डाव  खेळताना ठेकेदाराला फक्त आपली आणि बघ्याची पानं  दिसतात, विरोधी खेळाडूंची दिसत नाहीत.  क्षणभर कल्पना करा की जाधवकडे  १ इस्पिक, ४ बदाम, ५ चौकट  आणि ३ किलवर अशी १३ पानं आली होती.  मेननची योजना त्या परिस्थितीतदेखील सफल झाली असती. अर्थातच जाधवकडे सुरुवातीपासून इस्पिक पंथ कोरडा असता – इस्पिकचं एकही पान नसतं तर ही योजना निष्फळ झाली असती.  चांगली योजना बनवणं हेच फक्त ठेकेदाराच्या हातात असतं, निकाल काय लागेल हे पानं कशी लागली आहेत यावरही अवलंबून असतं. यावर सविस्तर चर्चा खालील चित्रफितीत आहे.

(आंतरराष्ट्रीय ब्रिजतज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com