भ्रष्टाचाराच्या आरोपावर आजपासून सुनावणी  *  प्लॅटिनी यांचा बहिष्कार टाकण्याचा विचार
जागतिक फुटबॉल संघटनेचे (फिफा) निलंबित अध्यक्ष सेप ब्लाटर आणि उपाध्यक्ष मायकल प्लॅटिनी यांच्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपांवरील सुनावणीला गुरुवारपासून फिफाच्या शिस्तपालन समितीसमोर सुरुवात झाली. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून फिफा मुख्यालयात प्रवेश न केलेल्या ब्लाटर यांना हजर राहावे लागले. फिफाच्या शिस्तपालन न्यायाधीशांसमोर आपण स्वत:वरील आरोपांचा बचाव करू शकतो, असा दावा ब्लाटर यांनी केला.
दरम्यान, युरोपियन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्लॅटिनी यांच्यावर शुक्रवारी सुनावणी होणार असून त्यावर ते बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. कारण फिफाच्या तपास यंत्रणेने या सुनावणीआधीच आजीवन बंदीचा निर्णय दिल्यामुळे सुनावणीला हजर राहण्यास काहीच अर्थ नसल्याचे मत प्लॅटिनी यांच्या वकिलांनी व्यक्त केले. स्वित्र्झलड पोलिसांनी केलेल्या तपासात ब्लाटर यांनी २०११ मध्ये प्लॅटिनींना दोन लाख अमेरिकन डॉलर दिल्याचे समोर आले आणि त्यानंतर दोघांवर ९० दिवसांच्या बंदीची कारवाई करण्यात आली. मात्र आपण कोणतेही चुकीचे काम केले नसल्याचा दावा या दोघांनीही केला आहे.
अमेरिका आणि स्वित्र्झलड पोलिसांनी फिफामधील भ्रष्टाचार जगासमोर आणून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर सर्व सूत्रे झटपट हलवली गेली आणि ब्लाटर यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. या रिक्त झालेल्या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत प्लॅटिनी यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता; परंतु आता त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहण्याची चिन्हे आहेत. या सुनावणीचा निकाल सोमवारच्या आधी लागण्याची शक्यता आहे.

रेयनाल्डो यांना अटक
एल सॅल्व्हाडोरचे माजी राष्ट्रीय फुटबॉल प्रमुख रेयनाल्डो व्हॅस्क्यूज यांना फिफामधील कोटय़वधी डॉलरच्या भ्रष्टाचारप्रकरणी गुरुवारी अटक करण्यात आल्याची माहिती सॅल्व्हाडोरच्या पोलीस अधिकाऱ्याने दिली. रेयनाल्डो जून २००९ ते जुलै २०१० या कालावधीत सॅल्व्हाडोर फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदावर होते. आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांच्या विपणन विभागाचे हक्क विकण्यावरून अमेरिकेने गतमहिन्यात गुन्हा दाखल केलेल्या १६ जणांमध्ये रेयनाल्डो यांचाही सहभाग आहे.