टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज झालाय. १७ डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून भारतीय संघ पहिल्यांदाच परदेशात गुलाबी चेंडूवर सामना खेळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने हा सामना संपल्यानंतर भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी विराटला बीसीसीआयने खास सुट्टी मंजूर केली आहे. या निर्णयावरुन विराटवर टीकाही झाली. परंतू ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने विराटच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

“पहिल्या कसोटीनंतर विराटचं भारतात परतण यात टीम इंडियाचं नुकसान आहे. विराट हा उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्यालाही ऑस्ट्रेलियात खेळायला आवडतं. पण तो देखील एक माणूस आहे आणि क्रिकेटव्यतिरीक्तही विराटला एक आयुष्य आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी तो परिवारासोबत राहतो आहे ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. यासाठी त्याला दाद द्यायलाच हवी.” पहिल्या कसोटी सामन्याआधी स्मिथ पत्रकारांशी बोलत होता.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व हे उप-कर्णधार अजिंक्य रहाणेकडे येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ दिवसीय सराव सामन्यातही अजिंक्यने भारतीय संघाचं नेतृत्व करत शतक झळकावून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे कसोटी मालिकेत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचं आव्हान कसं परतवून लावतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.