भारत-इंग्लंड कसोटी मालिका जार्वो नावाच्या चाहत्यामुळेही लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. हा ब्रिटीश चाहता लॉ़र्ड्स आणि लीड्स कसोटीतही मैदानात आला होता. त्याने टीम इंडियाची जर्सी घालत फलंदाज म्हणून मैदानावर पाऊल ठेवले होते. आता त्याने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

केनिंग्टनच्या ओव्हल मैदानावर भारत-इंग्लंडमध्ये चौथी कसोटी सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना जार्वोने मैदानात प्रवेश केला. वेगवान गोलंदाज उमेश यादव ३४व्या षटकाचा तिसरा चेंडू टाकत होता, तत्पूर्वी जार्वो गोलंदाजीसाठी मैदानात धावत आला. यावेळी तो इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला जाऊन धडकला. सुरक्षारक्षकांनी त्याला पळत जाऊन बाहेर काढले.

 

सेहवागने सांगितला उपाय..

समालोचन करणाऱ्या वीरेंद्र सेहवागने जार्वोच्या सततच्या मैदानावर येणाऱ्या प्रश्नावर एक उपाय दिला. ”भारतात चाहते मैदानात घुसल्यावर पोलीस कसे त्यांना दांड्याने मारून बाहेर काढतात, तसे जार्वोसाठी केले पाहिजे. मग हा चाहता यापुढे कोणत्याच मैदानावर येत नाही”, असे सेहवागने सांगितले. करोनाच्या काळात चाहत्यांचा खेळाडूंशी थेट संपर्क होणे, हे चांगले नसल्याचे याआधी अनेकांनी सांगितले होते.

लीड्स मैदानावर आजीवन बंदी

सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी जार्वोवर लीड्स मैदानावर आजीवन बंदी घालण्यात येणार असल्याचे यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने सांगितले होते. तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या जार्वोला सुरक्षारक्षकांनी धक्के मारत आणि बळजबरीने मैदानाबाहेर काढले. रोहित बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येणे अपेक्षित असतानाच जार्वो हेल्मेट घालून, बॅट घेऊन विशेष म्हणजे तोंडाला मास्क लावून ६९ नंबरच्या जर्सीसहीत फलंदाजीला आला होता. जार्वोने लॉर्ड्सवर केलेल्या प्रवेशानंतर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांना त्याच्या या कृत्यामुळे त्यांचे हसू आवरता आले नाही.

एका ट्विटमध्ये जार्वोने आपल्याबाबत माहिती दिली होती. “होय मी जार्वो आहे. भारतासाठी खेळणारा पहिला गोरा माणूस असल्याचा मला अभिमान आहे”, असे त्याने म्हटले होते.