भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला भारत अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यावरुन माघार घ्यावी लागणार आहे. फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे हार्दिक पांड्याच्या जागी तामिळनाडूच्या विजय शंकरला संधी देण्यात आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना होण्याआधी हार्दिक पांड्याची फिटनेस टेस्ट घेण्यात आली, ही टेस्ट उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले गुण मिळवू न शकल्यामुळे हार्दिकला अनफिट घोषित करण्यात आलं.
भारतीय संघात आपलं स्थान टिकवायचं असेल तर खेळाडूंना यो-यो फिटनेस टेस्ट द्यावी लागते. मात्र भारत अ संघासाठी हा निकष लागू पडत नाही. तरीही हार्दिक पांड्या फिटनेस टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भारत अ संघ न्यूझीलंड दौऱ्यात ४ दिवसीय कसोटी आणि वन-डे सामने खेळणार आहे.