संघाच्या प्रशिक्षक नेमणुकीची प्रक्रिया दरवेळी प्रमाणे यंदाही राबवण्यात येईल. मला त्यात कोणताही बदल झालेला दिसत नाही, असं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने संवाद साधला.

अनिल कुंबळे यांचा संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संपुष्टात येत आहे. त्यामुळे बीसीसीआयने गुरूवारी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठीचे अर्ज मागवले आहेत. यावेळी बीसीसीआयने कुंबळे यांचा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय घेतला नाही. याबाबत कोहलीला विचारणा करण्यात आली.

”संघाच्या प्रशिक्षक नेमणुकीची प्रक्रिया सर्वांसाठी समान आहे. याही वेळेस पूर्वीसारखीच प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे मला त्यात काहीच फरक दिसत नाही.”, असे कोहली म्हणाला.

बीसीसीआयने आज अर्ज मागवले असले तरी कुंबळे यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. त्यांना अर्ज न भरता थेट प्रक्रियेत सामावून घेतलं जाणार, असंही बीसीसीआयने जाहीर केलं आहे.

मँचेस्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीला यावेळी संघाच्या सुरक्षेबाबत विचारण्यात आलं. कोहलीने आमचं संपूर्ण लक्ष आता स्पर्धेवर असणार असल्याचं सांगत सुरक्षेच्या बाबतीत आम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नसल्याचं म्हटलं.

”आम्ही येथे स्पर्धेसाठी आलो आहोत हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. खेळाडूंनी सुरक्षेवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असं मला वाटतं नाही. येथे दाखल झाल्यानंतर मला काहीच वेगळं वातावरण दिसलं नाही. याआधी जशी परिस्थिती होती तशीच आजही आहे. संघ सुरक्षित आहे.”, असे विराट कोहली म्हणाला.