ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याने त्याला उर्वरित तीन कसोटी सामन्यांतून वगळण्यात आलं आहे.

अॅडलेड येथे शनिवारी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजीदरम्यान पॅट कमिन्सचा उसळता चेंडू जोरात शमीच्या उजव्या हाताच्या मनगटावर आदळला होता. यामुळे त्याला आपला हात वर उचलनंही अवघड झालं होतं. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. एनआयएन याबाबत वृत्त दिलं आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, शमीच्या हाताला फ्रॅक्चर असल्याने त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळेच त्याला बॅट उचलणेही अवघड बनले होते. दरम्यान, सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराट कोहली याने शमीला खूपच वेदना होत असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आल्याचंही तो म्हणाला होता.