भारताने न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करताना २४३ धावांत गुंडाळला. त्यास प्रत्युत्तर म्हणून भारताने केवळ ३ गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक ६२ धावा केल्या. या बरोबरच त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कर्णधार विराट कोहली यांच्या पंगतीत स्थान मिळवले.

रोहितने ७७ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार खेचत ६२ धावा केल्या. या बरोबरच रोहितने लिस्ट A कारकिर्दीत आपल्या १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आणि भारताकडून अशी कामगिरी करणारा चौथ्या क्रमांकाचा सर्वात जलद फलंदाज ठरण्याचा बहुमान पटकावला. रोहितने २६० धावांत १० हजार धावांचा टप्पा गाठला. या आधी विराटने २१९, माजी कर्णधार सौरव गांगुलीने २५२ आणि सचिनने २५७ धावांत लिस्ट A कारकिर्दीत हा टप्पा गाठला होता.

दरम्यान, अनुभवी रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने तिसऱ्या सामन्यात २४३ धावांपर्यंत मजल मारली. अनुभवी रॉस टेलरने ९३ तर टॉम लॅथमने ५१ धावांची खेळी केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी खेळी केल्या आणि भारताला सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवून दिला.