वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज किरॉन पोलार्डचे मत

मुंबई : वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाच्या निवड समिती सदस्यांमध्ये बदल झाल्यामुळेच आगामी विश्वचषकासाठी संघात निवड होण्याची शक्यता उंचावली असल्याचे मत धडाकेबाज फलंदाज किरॉन पोलार्डने व्यक्त केले.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोलार्डने बुधवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत ३१ चेंडूंत ८३ धावांची तुफानी खेळी साकारून संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. या खेळीच्या बळावर इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी विंडीज संघात स्थान मिळेल का, असे विचारले असता पोलार्ड म्हणाला, ‘‘नक्कीच. आमच्या राष्ट्रीय निवड समितीत आता बदल झाला असून नव्या सदस्यांची नेमणूक झाली आहे. डेव्ह कॅमेरून यांच्याऐवजी रिकी स्कीर्ट यांनी अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारली आहे. या खेळीमुळे माझ्याविषयी अनेक जण चर्चा करतील, याची खात्री आहे. परंतु माझे मुख्य लक्ष क्रिकेटचा आनंद लुटण्यावर व नैसर्गिक गुणवत्तेद्वारे सर्वोत्तम खेळ करण्यावरच आहे.’’

निवड समितीचे माजी अध्यक्ष डेव्ह यांच्याशी होणाऱ्या मतभेदांमुळे विंडीजच्या पोलार्ड, ख्रिस गेल, डॅरेन सॅमी, ड्वेन ब्राव्हो यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले.

‘‘तुम्ही जर ‘आयपीएल’ नियमितपणे पाहत असाल तर एक गोष्ट लक्षात येईल की रसेल, गेल, सुनील नरिन यांसारख्या विंडीज खेळाडूंमुळेच खरे तर सामने रंगतदार होत आहेत. त्यामुळे विश्वचषकासाठी या सर्वाची संघात निवड झाल्यास विंडीजला रोखणे इतरांसाठी कठीण जाईल,’’ असे ३१ वर्षीय पोलार्डने सांगितले.

पोलार्डची पत्नीला वाढदिवसाची भेट!

पंजाबविरुद्धची तुफानी खेळी पोलार्डने त्याच्या पत्नीला समर्पित केली. ‘‘मला माझ्या पत्नीने कठीण प्रसंगातही साथ दिली आहे. त्याशिवाय आज तिचा वाढदिवस असल्यामुळे ही खेळी मी तिला भेट म्हणून समर्पित करतो,’’ असे पोलार्ड म्हणाला. पोलार्डची पत्नी या सामन्यासाठी येऊ शकली नाही, परंतु त्याचा मुलगा किडन आपल्या वडिलांना प्रोत्साहन करण्यासाठी आवर्जून उपस्थित होता.