पांढऱ्या मोहरांच्या साहाय्याने खेळणाऱ्या सर्जी कर्जाकिनला मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील सातव्या डावात फायदा घेता आला नाही. त्यामुळे पहिल्या सहा डावांप्रमाणेच हा डावही बरोबरीत सुटला.

कर्जाकिनला सहाव्या डावापाठोपाठ सातव्या डावातही पांढऱ्या मोहरांनी खेळण्याची संधी होती. मात्र   या डावात एक प्यादे जास्त असूनही लाभ उठवता आला नाही.  बारा डावांच्या या लढतीत दोन्ही खेळाडूंचे प्रत्येकी साडेतीन गुण झाले आहेत. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येक डावात वेगवेगळ्या चालींनी प्रारंभ करण्यावर भर दिला आहे.

कर्जाकिनने सातव्या डावात वजिरापुढील प्याद्याने सुरुवात केली. डावात चांगली व्यूहरचना मिळविण्यासाठी त्याने तिसऱ्याच चालीत प्याद्याचा बळी देऊ केला. तथापि कार्लसनने हे प्यादे घेतले नाही. आठव्या चालीस कर्जाकिनने कॅसलिंग करीत राजा सुरक्षित केला. कार्लसनने १५ व्या चालीस कॅसलिंग केले. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे छोटे-छोटे मोहरे घेतले. २० व्या चालीत त्यांनी एकमेकांचे वजीर व पाठोपाठ एक हत्तीही घेतला. त्यानंतर कर्जाकिनकडे सहा प्यादी, एक उंट व एक हत्ती अशी स्थिती होती, तर कार्लसनकडे पाच प्यादी, एक हत्ती व एक उंट अशी स्थिती होती. खरं तर कर्जाकिनला एक प्यादे जास्त असल्यामुळे प्यादी विकसित करण्याची संधी होती. मात्र कार्लसन हा केव्हाही डावाला कलाटणी देऊ शकतो हे त्याला माहीत असल्यामुळे त्याने फारसा धोका पत्करला नाही. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी प्याद्यांची आगेकूच केली. तथापि कर्जाकिन हा बचावात्मक तंत्रावरच भर देत होता. त्याने ३३ व्या चालीत बरोबरीचा प्रस्ताव मान्य करीत अर्धा गुण पदरात पाडून घेतला.