आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु असली तरीही त्याच्या लोकप्रियतेत तसूभरही फरक पडलेला नाहीये. YouGov या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रियतेच्या निकषात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या यादीमध्ये मोदींपाठोपाठ आपलं स्थान मिळवलं आहे. या सर्वेक्षणामध्ये ४१ देशांमध्ये ४२ हजार लोकांची मत नोंदवण्यात आली होती.

टक्केवारीच्या निकषांमध्ये मोदींची लोकप्रियता ही १५.६६ तर धोनीची लोकप्रियता ही ८.५८ टक्के इतकी आहे. या खालोखाल यादीमध्ये सचिन तेंडुलकर ५.८१, विराट कोहली ४.४६, ख्रिस्तीयानो रोनाल्डो २.९५ तर लायनल मेसी २.३२ टक्के हे खेळाडू आहेत. देशभरात असलेल्या चाहत्यावर्गाच्या निकषावर ही टक्केवारी काढण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे, भारतीय संघात धोनीला स्थानही मिळवता आलेलं नाही. मात्र तरीही धोनीची लोकप्रियता कायम आहे.

महिलांच्या यादीत बॉक्सर मेरी कोमने १०.३६ टक्क्यांसह पहिल्या तर माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी दुसऱ्या, लता मंगेशकर तिसऱ्या, माजी भाजप नेत्या सुषमा स्वराज चौथ्या आणि बॉलिवूड सेलिब्रेटी पाचव्या स्थानावर आहे.