रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (आरसीबी) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल करोना चाचणीत निगेटिव्ह आला आहे. 22 मार्चला घेतलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आला होता.

virat kohli and devdutt padikkal

 

बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार देवदत्तला करोनाची लागण झाल्यानंतर क्वारंटाइन करण्यात आले होते. पण, आता तो संघात सामील होईल. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, तो 9 एप्रिल रोजी मुंबईविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यातही तो खेळू शकतो.

देवदत्तची तंदुरुस्ती आरसीबीसाठी महत्त्वाची

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आपला पहिला सामना गतविजेत्या मुंबईविरुद्ध खेळणार आहे. गेल्या हंगामात देवदत्तने आयपीएल पदार्पण केले आणि सलामीसाठी फलंदाजी करताना त्याने जबरदस्त कामगिरी केली. मागील वर्षी देवदत्तने  15 सामन्यात 5 अर्धशतकांसह 473 धावा केल्या. त्यामुळे तो या हंगामात पहिल्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त राहिला, तर आरसीबीसाठी मोठा दिलासा असेल.

यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलही करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. संसर्गाची लागण झाल्यानंतर त्याला क्वारंटाइन करण्यात आले. दिल्लीने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षर पटेलने 28 मार्च 2021 रोजी मुंबईतील हॉटेलमध्ये निगेटिव्ह चाचणीनंतर प्रवेश केला. दुसर्‍या करोना चाचणी दरम्यान त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

अक्षर पटेलच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाचे वैद्यकीय पथक त्याच्या सतत संपर्कात आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक सदस्यही करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. करोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम यूएईमध्ये खेळवण्यात आला. परंतु यावर्षी आयपीएलचे भारतात पुनरागमन झाले आहे.