भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने गेल्या काही वर्षांत स्वतःची संघातली जागा सिद्ध केली आहे. वन-डे, टी-२० संघात सलामीला येणाऱ्या रोहितला २०१९ च्या अखेरीस कसोटीतही सलामीला येण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत रोहितने कसोटी संघातही सलामीच्या जागेवर दावेदारी सांगितली. रोहित शर्माच्या गेल्या काही वर्षांमधल्या कामगिरीवर न्यूझीलंडचा माजी खेळाडू आणि समालोचक सायमन डुल चांगलाच खुश झाला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सचिन तेंडुलकरपेक्षा सर्वोत्तम सलामीवीर असल्याचं मत डुल यांनी व्यक्त केलंय.

“रोहित शर्मा ज्या पद्धीतेने स्वतःचा स्ट्राईक रेट वाढवतो ते पाहण्यासारखं असतं. नव्वदीत आल्यानंतर तो कधी थांबून खेळतोय किंवा अडखळत खेळतोय असं कधीच होत नाही. तो उत्कृष्ट खेळाडू आहे. अनेकदा भारतात क्रिकेट म्हटलं की सचिनचं नाव पुढे येतं, मी देखील सचिनच्या खेळाचं अनेकदा कौतुक केलं आहे. पण तुम्ही दोघांचीही आकडेवारी तपासलीत तर रोहित यामध्ये सरस ठरतो. म्हणूनच माझ्यासाठी सचिन आणि रोहितमध्ये रोहित हा सर्वोत्तम सलामीवीर आहे.” सायमन डुल ICC च्या Inside Out कार्यक्रमात बोलत होते.

नवीन वर्षात रोहित शर्मा भारतीय संघाच्या पहिल्या परदेश दौऱ्यात सहभागी झाला होता. न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत रोहितने चांगली कामगिरी केली. मात्र अखेरच्या टी-२० सामन्यात दुखापत झाल्यामुळे रोहितला आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं. यानंतर रोहित बंगळुरुतील NCA च्या ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा फिटनेस सुधारण्याकडे भर देत होता. आयपीएलच्या तेराव्या हंगामात रोहित मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरणार होता, पण करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदाचं आयपीएल पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं आहे.