२०११ चा एकदिवसीय विश्वचषक भारताने जिंकला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ९१ धावांची खेळी केली. संपूर्ण स्पर्धेत युवराज सिंगने धडाकेबाज कामगिरी केली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात विराट बाद झाल्यावर युवराज मैदानावर येणार असे साऱ्यांना वाटत असतानाच धोनीने मैदानात प्रवेश केला. धोनीवर आधारित चित्रपटात देखील ही बाब दाखवण्यात आली आहे. मात्र या चित्रपटात दाखवण्यात न आलेल्या एक गोष्टीबाबत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग या दोघांनी खुलासा केला.

… म्हणून World Cup फायनलमध्ये दोन वेळा झाली होती नाणेफेक

“गंभीर आणि विराट दोघांनमधील भागीदारी चांगलीच रंगली होती. दोघेही चांगला खेळ करत होते. अशा परिस्थितीत आम्हाला प्रतिस्पर्धी संघाच्या दोन पावलं पुढचा विचार करायचा होता. त्याच वेळी मी विरूला सांगितलं की जर डावखुरा फलंदाज (गंभीर) बाद झाला, तर युवराजने फलंदाजीसाठी जावं.. पण जर उजव्या हाताचा फलंदाज (विराट) बाद झाला, तर मात्र धोनीने फलंदाजीसाठी जायला हवं. युवराज तुफान लयीत होता यात वादच नाही, पण श्रीलंकेकडे दोन ऑफ-स्पिनर्स होते. त्यामुळे आयत्या वेळी फलंदाजीच्या क्रमवारीत केलेला बदल फायद्याचा ठरेल असं आम्हाला वाटलं”, असा खुलासा टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सचिनने विश्वचषक विजेतेपदाचा प्रवास सांगताना केला.

WC 2011 : धोनीमुळेच माझं वर्ल्ड कपमधील शतक हुकलं – गौतम गंभीर

सचिन पुढे म्हणाला, “श्रीलंकेकडे दोन अनुभवी ऑफ स्पिनर्स होते. त्यामुळे डाव्या-उजव्या फलंदाजाचे मैदानावर असणे महत्त्वाचे होते. गौतम गंभीर अप्रतिम फलंदाजी करत होता. अशा परिस्थितीत एकेरी-दुहेरी धावा काढण्यात माहीर असलेल्या धोनीने मैदानावर जाणं योग्य होतं. त्यामुळे मी विरूला सांगितलं की तू दोन षटकांच्या मध्ये जा आणि धोनीला ही गोष्ट समजावून सांग”

“डाव्या-उजव्या फलंदाजाच्या जोडीने मैदानात असणं हा चांगला पर्याय होता. जेव्हा सचिन मला धोनीला निरोप द्यायला सांगत होता, नेमका तेव्हा धोनी ड्रेसिंग रूममधून बाहेर आला. त्यावेळी सचिनने मग थेट धोनीलाच ही गोष्ट समजावून सांगितली”, असे सेहवागने सचिनच्या वक्तव्याला दुजोरा देत सांगितले.

WC 2011 Flashback : असा झाला होता भारत ‘विश्वविजेता’

सचिन सेहवागच्या मुद्द्यालाच जोडून सांगू लागला, “मी जेव्हा धोनीशी याविषयी चर्चा केली, तेव्हा धोनी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्याकडे गेला. त्यानंतर आम्ही चौघांनी याबाबत चर्चा केली. गॅरी कर्स्टन यांनादेखील हा मुद्दा पटला. त्यानंतर धोनीने स्वत:ला फलंदाजी क्रमवारीत बढती दिली.”

 

“अचानक फलंदाजीच्या क्रमात केलेला बदल श्रीलंकेच्या पचनी पडायला काहीसा उशीरच झाला आणि ते आमच्या फायद्याचे ठरले”, असे त्यावर सेहवागने सांगितले.