सोमवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये सेरेना विल्यम्स आणि अन्य खेळाडू अशी स्पष्ट विभागणी झाली आहे. सेरेना विल्यम्स ३२ वर्षांची आहे तर बाकी सगळ्या खेळाडू तिशीच्या आतल्या आहेत. टेनिसच्या दृष्टीने आणि विशेषत: महिला टेनिसचा विचार करता सेरेनाचे वय जेतेपदासाठी प्रतिकूल असे, मात्र तरीही सेरेना विल्यम्सच जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. तिशीतही अफाट ऊर्जेसह झंझावाती खेळ करणारी सेरेनाने सलग २२ सामने जिंकली आहे. ही विजयी परंपरा कायम राखत ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे सहा तर कारकिर्दीतील विक्रमी अठरावे जेतेपद पटकावण्यासाठी सेरेना सज्ज झाली आहे.
नुकत्याच झालेल्या ब्रिस्बेन स्पर्धेचे जेतेपद पटकावत सेरेनाने जेतेपदांची भूक कायम असल्याचे दाखवून दिले आहे. गेल्या वर्षी फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदानंतर सेरेनाने अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपदही पटकावले होते. दुखापतीनंतर तडफदार पुनरामगन करणारी सेरेना अन्य खेळाडूंसाठी जेतेपदातला मुख्य अडसर आहे. याआधी २००३, २००५, २००७, २००९ आणि २०१० मध्ये सेरेनाने या स्पर्धेचे जेतेपद नावावर केले होते. यंदा ही स्पधा जिंकत मार्टिना नवरातिलोव्हा आणि ख्रिस इव्हर्ट यांच्या १८ ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची सेरेनाला संधी आहे.