कोलंबोच्या मैदानावर श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडची सुरूवात अतिशय खराब झाली. बिनबाद ६३ या धावसंख्येवरून न्यूझीलंडची अवस्था एका वेळी ३ बाद ७१ झाला होता. पण त्यानंतर अनुभवी रॉस टेलरने मात्र डाव सावरला. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्यावर शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढवली. त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे तब्बल ४ वर्षांनंतर त्याच्यावर ही दुर्दैवी वेळ आली.

पहिल्या दिवशी पावसामुळे सामना ६८ षटकांचा खेळ झाल्यावर थांबला. त्यावेळी न्यूझीलंडचे पाच फलंदाज माघारी परतले होते. पण या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला भोपळाही फोडता आला नाही. विलियम्सन २०१५ नंतर प्रथमच कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. याआधी २९ मे २०१५ मध्ये इंग्लंडविरुद्ध लीड्स येथे कसोटीत खेळताना तो शून्यावर बाद झाला होता. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केल्यास २०१८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध टी २० सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता.

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने २६ व्या षटकापर्यंत एकही गडी गमावला नव्हता. जीत रावल (३३) आणि टॉम लॅथम (३०) यांनी न्यूझीलंडला साजेशी सुरुवात करून दिली होती. पण, अकिला धनंजयाने सामन्याला कलाटणी दिली. त्याने सामन्याच्या २७ व्या षटकात टॉम लॅथम आणि पाठोपाठ विलियम्सनला माघारी धाडले. ३१ व्या षटकात रावललाही त्याने बाद केले. त्यामुळे त्यांची अवस्था ३ बाद ७१ अशी झाली होती. पण त्यानंतर टेलर आणि निकोल्स यांनी शतकी भागीदारी करून डाव सावरला. त्यांची ही भागीदारी धनंजयाने संपुष्टात आणली. त्याने निकोल्सला पायचीत केले. निकोल्सने ७८ चेंडूंत ४२ धावा केल्या. त्यानंतर आलेला बीजे वॉटलिंग यानेही अवघ्या एका धावेवर पायचीत झाला. टेलर मात्र चांगली खेळी केली.