IND vs WI : हैदराबाद येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उमेश यादवने वेस्ट इंडिजच्या दहा फलंदाजांना बाद करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. उमेश यादवच्या या कामगिरीचे कौतुक भारतीय कर्णधार विराट कोहलीने केले आहे. तसेच उमेश यादवचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील स्थान पक्के असल्याची कल्पनाही दिली आहे. सध्या भारतीय संघाकडे बुमराह, भुवनेश्वर, शामी आणि उमेश यादव असे चार आघाडीचे गोलंदाज आहेत. अशामध्ये अंतिम ११ खेळाडूत संधी मिळवण्यासाठी यांच्या चुरस असते. पण, उमेशने धारधार गोलंदाजी करत आपण शर्यतीत असल्याचे दाखवून दिले आहे.
शार्दुलच्या अनुपस्थितीत उमेशने आपली कामगिरी उत्तम बजावली. त्याने अचूक टप्यावर गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना बाद केले. उमेशने ज्या पद्धतीने ३९ षटके गोलंदाजी केली ती पाहता त्याच्या तंदुरुस्तीची कल्पना येते. फलंदाजाला खेळताच येणार नाही, असे चेंडू उमेश मधूनमधून टाकत राहतो. त्यामुळे आपोआपच त्याचा आत्मविश्वासही उंचावतो. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी कशी करावी याचे भान येऊ लागले आहे.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना विराट कोहलीने उमेशवर स्थुतीसुमने उधळली. नोव्हेंबर-डिसेबंरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघात आपल्या नावाचा प्राधान्याने विचार व्हावा, यादृष्टीने उमेश यादवने उत्तम तयारी केली आहे. कारकीर्दीतील एक सर्वोत्तम कामगिरी उमेशने करून दाखविली आहे. ऑस्ट्रेलियातील चार कसोटीत गोलंदाजांना भरपूर मेहनत घ्यावी लागेल. कारण इंग्लंडप्रमाणे चेंडूला अनुकूल वातावरण नसेल. संपूर्ण दिवस गोलंदाजाला अचूक टप्पा आणि दिशा ठेवून गोलंदाजी करावी लागेल. अशा परिस्थितीत उमेश हा योग्य गोलंदाज ठरू शकतो. भारतीय संघातील चारही गोलंदाज जेव्हा ताशी १४०च्या वेगाने गोलंदाजी करतात तेव्हा कोणत्याही कर्णधाराला समाधानच वाटते.
घरच्या मैदानात कसोटी सामन्यात १० विकेट घेण्याची कामगिरी करणारा उमेश यादव तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांनी अशी कामगिरी केली आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये ४ चेंडूंमध्ये ३ बळी घेणारा उमेश यादव तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. उमेश यादवच्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा तिसऱ्या दिवशीच दहा गड्यांनी पराभव केला. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवला.
विंडीजविरुद्धची दुसरी कसोटी भारताने १० गडी राखून जिंकली. उमेश यादवचा भेदक मारा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे – ऋषभ पंत जोडीची भागीदारी याच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिका २-० अशी जिंकली. विंडीजचा दुसरा डाव १२७ धावांत आटोपल्यानंतर भारताने ७२ धावांचे अंतिम लक्ष्य एकही बळी न गमावता पूर्ण केले. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने आणि लोकेश राहुल धावा केल्या. १० बळी टिपणाऱ्या उमेश यादवला सामनावीर तर पृथ्वी शॉला मालिकावीर घोषित करण्यात आले.