प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचे स्पष्टीकरण

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकत्याच जाहीर केलेल्या वार्षिक करारात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ‘अ’ श्रेणी देऊन त्याच्यावर अन्याय केल्याची क्रिकेटवर्तुळात चर्चा होती. मात्र तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी ‘अ+’ श्रेणी असावी, हे धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांनीच सुचवल्याचे बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयकडून २६ क्रिकेटपटूंना वार्षिक करार देण्यात आला. यात कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांना सात कोटी मानधन असलेली ‘अ+’ श्रेणी देण्यात आली. धोनीला मात्र पाच कोटी मानधन असलेली ‘अ’ श्रेणी दिल्याबद्दल सर्वाना आश्चर्य वाटले होते.

‘‘क्रिकेटपटूंनी स्वत:हून ‘अ+’ श्रेणी सुचवली आहे. या श्रेणीबाबत आम्ही धोनी आणि कोहलीशी चर्चा केली होती. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जागतिक दर्जाची कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी एक श्रेणी असावी. भारतीय क्रिकेटमधील अव्वल कामगिरी करणारे क्रिकेटपटू कोण आहेत, हे स्पष्ट करणारी ‘अ+’ श्रेणी असावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला होता,’’ असे राय यांनी सांगितले.

वार्षिक करारात स्थानिक खेळाडूंच्या मानधनातही भरघोस वाढ झाली आहे, याबाबत राय म्हणाले, ‘‘स्थानिक क्रिकेटमधील खेळाडूंच्या मानधनातील वाढसुद्धा खेळाडूंशी चर्चा करून झाली आहे. ज्या खेळाडूंना वर्षांला १०-१२ लाख रुपये मिळत होते, त्यांना आता २०-२२ लाख रुपये मिळू शकतील. शिवाय प्रक्षेपण हक्काच्या लाभातून पैसे त्यांना देण्यात येणार आहेत.’’