12 Years of Virat Kohli: १८ ऑगस्ट ही तारीख भारतातील कोट्यवधी क्रिकेट चाहते आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास आहे. सध्याच्या काळातील सर्वात प्रतिभावान फलंदाजांपैकी एक असा विराट कोहली याने आजच्या दिवशी १२ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले होते. १८ ऑगस्ट २००८ रोजी विराटने वन डे क्रिकेटच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. श्रीलंकेच्या दाम्बुला स्टेडियममध्ये विराटने आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली.

विराट सध्या वन डे क्रमवारीत जगातील अव्वल फलंदाज असला, तरी पदार्पणाच्या सामन्यात त्याची कामगिरी फारशी उल्लेखनीय झाली नव्हती. कोहलीला पहिल्या सामन्यात २२ चेंडूत फक्त १२ धावा करता आल्या होत्या. सलामी फलंदाज म्हणून गौतम गंभीरबरोबर कोहलीने क्रीजवर प्रवेश केला होता. त्या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती. दुसर्‍याच चेंडूवर गंभीर माघारी परतला होता. त्यानंतर कोहलीने सुरेश रैनासोबत डावा पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता, पण चामिंडा वासच्या चेंडूमुळे कोहलीची खेळी १२ धावांवर संपुष्टात आली होती.

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात अपयश आलेल्या कोहलीने चौथ्याच सामन्यात ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिलं होतं. त्याने त्या सामन्यात पहिले अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर मात्र कोहलीने मागे वळून पाहिलंच नाही. १२ वर्षांत त्याने धडाकेबाज कामगिरी केली. त्यामुळेच तो सध्या जागतिक वन डे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल, कसोटी यादीत दुसरा तर टी२० यादीत १०वा आहे. वन डे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत कोहली ११,८६७ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे फक्त सचिन तेंडुलकर (१८,४२६) आहे. आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीतही तो ७० शतकांसह जगात दुसरा आहे. तर सचिन १०० शतकांसह अव्वल आहे.

कोहलीने २०१५मध्ये महेंद्रसिंग धोनीनंतर कसोटी कर्णधारपद आणि २०१७मध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यांचे नेतृत्व स्वीकारले. त्याच्या नावावर ७,२४० कसोटी धावा आहेत. भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक दुहेरी शतके (७) करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.