scorecardresearch

विराट कोहली आणि त्याचे वाद

या ५ वादांमुळे तुम्ही कोहलीला कधीच विसरणार नाही

विराट कोहली आणि त्याचे वाद
विराट कोहली, (संग्रहित छायाचित्र)

महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर आली. आतापर्यंत आपल्या कामगिरीतून विराट कोहलीने भारतीय संघाची जबाबदारी सांभाळण्यासाठी आपण सक्षम असल्याचं दाखवून दिलं आहे. मात्र आपल्या आक्रमक स्वभावामुळे विराट नेहमी मैदानात आणि मैदानाबाहेर चर्चेत राहिला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षाखालील संघाने विश्वचषक जिंकला होता. यावेळीही मैदानातील आक्रस्ताळ्या स्वभावामुळे विराट चर्चेत आला होता. आज विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दीत गाजलेल्या ५ वादांवर आपण नजर टाकणार आहोत.

५. मैदानात आक्षेपार्ह हातवारे
kohli-new

कोणत्याही कारणावरुन विराट कोहलीला मैदानात भडकताना आपण पाहिलेलं आहे. मग जेव्हा समोर ऑस्ट्रेलियाचा संघ असेल तेव्हा कोहलीचा आपल्यावर ताबा राहणं केवळ अशक्य असतं. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी कसोटीदरम्यान काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षक मैदानात विराट कोहलीची टर उडवत होते. यावेळी कोहलीने त्यांच्याकडे आक्षेपार्ह हातवारे करुन दाखवले.

याबद्दल विराटच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापून घेण्यात आली होती. मात्र आपल्या या वर्तनाचा विराट कोहलीला अजिबात पश्चाताप नव्हता. जर आपल्याला कोणी आई-बहिणीवरुन शिवीगाळ करणार असेल तर आपण शांत बसू शकत नाही असं कोहलीने आपल्या स्पष्टीकरणात म्हणलं होतं.

४. बीसीसीआयचे नियम धाब्यावर
anushka

विराट कोहली आणि अभिनेत्री अनु्ष्का शर्मा यांच्यातले प्रेमसंबंध हे जगासमोर आलेच आहेत. बऱ्यात वेळा भारतीय संघाचे सामने बघायला अनुष्का शर्मा स्वतः हजर असते. बऱ्याच वेळा दोघेही जण वेळात वेळ काढून फिरायलाही जात असतात. मात्र याच कारणामुळे कोहली एकदा अडचणीत आला होता.
२०१५ साली आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या सामन्यात ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कोहली अनुष्कासोबत गप्पा मारताना दिसला होता. बीसीसीआयच्या नियमांनूसार सामना सुरु असताना खेळाडूला संघातील सदस्यांशिवाय इतर कोणाशीही बोलायची परवानगी नसते. मात्र मीडियात हे प्रकरण समोर आल्यानंतर बीसीसीआयने कोहलीला समज देऊन सोडून दिलं.

३. पत्रकाराला शिवीगाळ
kohli-journalist

२०१५ साली भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पर्थ येथे सरावादरम्यान कोहलीने हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्राच्या पत्रकाराला शिवीगाळ केली होती. आपली गर्लफ्रेंड अनुष्का शर्माबद्दल लिहीलेल्या एका लेखाबद्दल विराटने पत्रकाराला सर्वांसमोर आपली नाराजी बोलून दाखवली होती.

यानंतर चौकशीदरम्यान ज्या पत्रकाराला कोहलीने शिवीगाळ केली त्याने अनु्ष्काबद्दल कोणतीही गोष्ट लिहीली नसल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी बीसीसीआयने या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरीही कोहलीला समज देऊन त्याला सोडण्यात आलं होतं. यानंतर कोहलीनेही पत्रकाराची माफी मागत या विषयावर पडदा टाकला होता.

२. स्टिव स्मिथसोबत वाद
smith-kohli

मागच्या वर्षी स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. यावेळी बंगळुरुच्या दुसऱ्या कसोटीत स्मिथ पायचीत झाला होता. यावेळी पंचांनी दिलेल्या निर्णयाचा रिव्ह्यू घेण्याची संधी स्मिथकडे होती. मात्र यावेळी स्मिथने ड्रेसिंग रुममध्ये आपल्या सहकाऱ्यांकडून सल्ला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट कोहलीने याला आक्षेप घेतला. यावेळी मैदानात आणि मैदानाबाहेर कोहली आणि स्मिथ यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं होतं.

१. प्रशिक्षक कुंबळेंसोबत वाद

Indian cricket team captain Virat Kohli (R) and team head coach Anil Kumble (L) watch their teammates during a practice session at the Warner Park stadium in Basseterre, Saint Kitts, on July 13, 2016. / AFP / Jewel SAMAD (Photo credit should read JEWEL SAMAD/AFP/Getty Images)

गेला महिनाभर सुरु असलेल्या या वादावर अखेर काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने पडदा टाकला आहे. चॅम्पियन्स करंडकादरम्या विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात वाद असल्याचं समोर आलं होतं. हा वाद इतका टोकाला गेला होता की विराट आणि अनिल कुंबळे एकमेकांसोबत बोलत नसल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. काही वृत्तपत्रांमध्ये तर अंतिम सामन्यात विराट कोहलीने जाणुनबुजून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असं छापून आलं होतं.

चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर मात केली आणि भारतीय प्रेक्षकांनी विराटच्या संघावर चांगलंच तोंडसुख घेतलं. त्यापाठोपाठ कुंबळेंनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने बीसीसीआय आणि कोहलीला क्रीडारसिकांच्या चांगल्याच रोषाला सामोरं जावं लागलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-07-2017 at 19:30 IST

संबंधित बातम्या