जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीचा सामना करणे कोणत्याही फलंदाजासाठी आव्हानात्मकच असले तरी चेतेश्वर पुजाराने फलंदाजीत दिलेल्या अमूल्य योगदानामुळेच भारताने मालिकेत वर्चस्व मिळवले आहे, अशी प्रतिक्रिया माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रॅड हॉजने मंगळवारी व्यक्त केली.

‘‘पुजाराची संयमी फलंदाजी दोन्ही संघांमधील फरक ठरत आहे. उभय संघांतील गोलंदाजांनी मालिकेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली असून पर्थ येथील पहिले सत्र व मेलबर्न कसोटीत मयांक अगरवालने झळकावलेल्या अर्धशतकाव्यतिरिक्त सर्व सलामीवीरांना संघर्ष करावा लागला आहे,’’ असे हॉज म्हणाला.

‘‘तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाजाचे योगदान संघासाठी फार महत्त्वाचे ठरते. भारताच्या पुजाराने या क्रमांकावर फलंदाजी करताना वेळकाढूपणा केलाच, त्याशिवाय धावांचीही टांकसाळ उडवली. त्याला बाद करणे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी कठीण जात आहे, हेच आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे माझ्या मते पुजाराच या मालिकेतील सर्वाधिक उल्लेखनीय खेळाडू आहे,’’ असे हॉजने सांगितले.