scorecardresearch

World Cup 2019 : ‘टीम इंडिया’चा ऑस्ट्रेलियाला दणका; केला कोणालाही न जमलेला विक्रम

भारताने ठोकल्या धमाकेदार ३५२ धावा

World Cup 2019 : ‘टीम इंडिया’चा ऑस्ट्रेलियाला दणका; केला कोणालाही न जमलेला विक्रम

ICC World Cup 2019 IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात सलामीवीर शिखर धवनचे दमदार शतक (११७) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (५७) व कर्णधार विराट कोहली (८२) यांची अर्धशतके यांच्या खेळीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ३५२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला ३५३ धावांचे आव्हान दिले. या बरोबरच भारतीय संघाने एक धमाकेदार विक्रम नोंदवला. भारतीय संघाच्या ‘टॉप ३’ फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. या फलंदाजीच्या जोरावर भारताने विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंतचा सर्वात मोठी धावसंख्या उभारली. इतकेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघाने केलेली ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्यास सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी आपापली अर्धशतके पूर्ण करून भारताला शतकी सलामी मिळवून दिली. सलामीवीर रोहित शर्माने ७० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार खेचत ५७ धावा केल्या. पण कुल्टर-नाईलच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. पण धवनने विराटच्या साथीने डाव पुढे नेला आणि दमदार शतक झळकावले. शतक झाल्यावर मोठे फटके खेळताना धवन बाद झाला. मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात तो ११७ धावावर झेलबाद झाला. मिचेल स्टार्कने धवनला माघारी पाठवले आणि भारताला दुसरा धक्का दिला. धवनने १६ चौकार लगावले. त्यानंतर हार्दिक पांड्याला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती देण्यात आली. त्याने त्याच्या बढतीचा पूर्ण उपयोग केला. त्याने २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकार यांच्या मदतीने ४८ धावा केल्या. २ धावांनी त्याचे अर्धशतक हुकले.

कर्णधार कोहलीने एक बाजू लावून धरत दमदार ८२ धावा केल्या. तोदेखील मोठा फटका खेळताना बाद झाला. त्याने त्याच्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार खेचले. अनुभवी धोनीनेदेखील झकास खेळी करत १४ चेंडूत २७ धावा केल्या. तर शेवटच्या षटकात फलंदाजीला आलेल्या लोकेश राहुलने ३ चेंडूत ११ धावा केल्या आणि भारताला २५२ धावांपर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियाकडून स्टोयनीसने २ तर कुल्टर-नाईल, स्टार्क आणि कमिन्स यांनी १-१ बळी टिपला.

सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. “मी नाणेफेक जिंकली असती, तर मी देखील फलंदाजीलाच प्राधान्य दिले असते”, यावेळी ऑस्ट्रेलीयाचा कर्णधार आरोन फिंच म्हणाला. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांच्याही संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही संघांनी आपला गेल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 ( Cricket-world-cup-2019 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Icc world cup 2019 team india score highest ever total vs aus in wc