WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्थितीत आहे. ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली. पहिल्या दिवशी हे दोघेही अनुक्रमे १४६* आणि ९५* धावांसह खेळपट्टीवर कायम होते. दुसऱ्या दिवशी स्मिथने आपले ३१वे कसोटी शतक पूर्ण केले. हेड कडेही मोठा विक्रम नावावर करण्याची संधी होती. मात्र, अवघी एक धाव कमी पडल्यामुळे तो असे करू शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. भारताच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सर्व महत्त्वाचे फलंदाज तंबूत परतले आहेत.
कांगारूंनी पहिल्या दिवशी फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाला पछाडले आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४६९ धावांवर आटोपल्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीकडून भक्कम सलामीची टीम इंडियाला अपेक्षा होती. पण कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म आता ही सुरूच असून त्याने १५ धावा केल्या. त्याला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पायचीत केले.




आयपीएल गाजवणारा शुबमन गिल अवघ्या १३ धावांवर बाद झाला. त्याला तर ऑसी गोलंदाजाने चांगलंच मूर्ख बनवलं. फॉर्ममध्ये असणारा शुबमन गिल चांगल्या लयीत दिसत होता. आक्रमक फटकेबाजी करत त्याने चांगली सुरूवात करून दिली होती. पण ऑफस्टंपच्या जवळची लाइन ओळखण्यात त्याची चूक झाली. अनेक चेंडू ऑफस्टंपवरून बाहेर जात असल्याने त्याने स्कॉट बोलंडचा तसाच येणारा एक चेंडू सोडून दिला आणि त्याला मुर्खात काढलं. चेंडू टप्पा पडल्यावर आत आला आणि शुबमन गिलचा ऑफस्टंप उडाला. हेच अगदी भारताची नवी वॉल असणारा चेतेश्वर पुजारा बाबतीत घडले. त्याला स्कॉट बोलंडने मुर्खात काढले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया अडचणीत असल्याचं दिसत आहे. ७१ धावांवर भारताला चौथा धक्का बसला. रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा यांच्यानंतर आता विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला आहेत. कोहलीला स्टार्कने स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. त्याने केवळ १४ धावा केल्या असून अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा खेळपट्टीवर टिकून आहेत. भारताने १०० धावा पूर्ण केल्या असून सामन्यात अजूनही तीन दिवस बाकी आहेत. त्यामुळे भारताला मोठ्या भागीदारीची गरज आहे.
तत्पूर्वी, ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १६३ धावांची खेळी केली. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने १२१ धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २८५ धावांची भागीदारी केली. अॅलेक्स कॅरीने ४८ आणि डेव्हिड वॉर्नरने ४३ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. मिचेल स्टार्क धावबाद झाला. या मोठ्या धावसंख्येशी बरोबरी साधण्यासाठी भारताला तिसऱ्या दिवसअखेरपर्यंत फलंदाजी करावी लागणार आहे.