India vs England, 4th Test Match Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांची येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला. इंग्लंडने पहिल्या डावात ३५३ धावा केल्या होत्या. तर भारतीय संघ पहिल्या डावात ३०७ धावांवर गारद झाला. बेन स्टोक्सच्या संघाने पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर इंग्लिश संघ दुसऱ्या डावात फार मोठी कमाल करू शकला नाही. इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडला १९१ धावांची आघाडी तर भारताला दुसऱ्या डावात १९२ धावांचं लक्ष्य मिळालं आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या दुसऱ्या डावाची सावध सुरुवात केली.

तिसऱ्या दिवसअखेर भारताने एकही फलंदाज न गमावता ४० धावा जमवल्या आहेत. कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा २४, तर यशस्वी जैस्वाल १६ धावांवर नाबाद माघारी परतले. हा सामना जिंकण्यासाठी उर्वरित दोन दिवसांत भारताला १५२ धावांची आवश्यकता आहे. टीम इंडिया हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली तर मालिकेत ३-१ अशी अजेय आघाडी मिळवेल. मालिकेतील पहिला कसोटी सामना इंग्लंडने तर पुढचे दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत.

दरम्यान, इंग्लंडच्या दुसऱ्या डावात रवीचंद्रन अश्विनने पाच विकेट घेतल्या. हा त्याचा ३५ वा फाईव्ह विकेट हॉल आहे (अश्विनने ३५ वेळा एकाच डावात ५ बळी घेण्याची किमया केली आहे). दरम्यान, या डावात कुलदीप यादवने चार बळी घेत अश्विनला सुरेख साथ दिली. जडेजाने एका फलंदाजाला बाद केलं. या डावात इंग्लंडकडून झॅक क्राऊलीने सर्वाधिक सर्वाधिक ६० धावाांची खेळी केली.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर बेन डकेट १५ धावा करून बाद झाला. ऑली पोप एकही धाव न काढता अश्विनचा बळी ठरला. जो रूट ११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जॉनी बेअरस्टोने ३० धावा केल्या. कर्णधार बेन स्टोक्स ४ धावा करून कुलदीप यादवचा बळी ठरला. तर बेन फॉक्सने १७ धावा केल्या. इंग्लंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. त्यामुळे इंग्लिश संघ अवघ्या १४५ धावांवर गारद झाला. त्यामुळे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर १९२ धावांचे लक्ष्य आहे.

हे ही वाचा >> IND vs ENG 4th Test : ‘माझ्या भावा, स्वप्न साकार…’, भारतासाठी संकटमोचक ठरलेल्या जुरेलसाठी रिंकूची भावनिक पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्णधार रोहितला खेळाडूची काळजी

दरम्यान या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजीवेळी रोहित शर्मामधला जबाबदार आणि आपल्या खेळाडूंची काळजी घेणारा कर्णधार पाहायला मिळाला. नवोदित खेळाडू सर्फराझ खान पॅड आणि हेल्मेटशिवाय सिली पॉईंटला उभा राहत होता. तेवढ्यात रोहितने त्याला अडवलं आणि म्हणाला, “ए भाय, ज्यादा हिरो नहीं बनने का, हेल्मेट पहन.” रोहित हे केवळ सर्फराझच्या काळजीपोटी बोलत होता. रोहितने सांगितल्यानंतर सर्फराझनेही कप्तानाच्या आदेशाचं पालन करत हेल्मेट घातलं आणि सिली पॉईंटला उभा राहिला.