भारतीय क्रिकेट संघ उद्या म्हणजेच ३ डिसेंबर रोजी न्यूझीलंडविरोधात दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय संघात आता विराट कोहलीसुद्धा खेळणार आहे. संघ कसा असेल याच्या नियोजनाबद्दल कोहलीने आज भाष्य केलं आहे. बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर कोहली खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

विराटने सांगितलं की आम्ही परिस्थितीनुसार कोण खेळणार, कोण मैदानाबाहेर राहील याचं नियोजन करणार आहोत. हवामान आणि बदलणारी परिस्थिती लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल. आपल्याला असा विचार करुन चालणार नाही की पाचही दिवस हवामान एकसारखंच राहील. जर हवामान बदललं तर आमचा निर्णयही त्याप्रमाणे बदलू शकतो.

कोहलीने हेही सांगितलं की, वानखेडे स्टेडियम हे गोलंदाजांसाठी महत्त्वाचं आहे. इथं खेळत असल्याने आमच्या खेळाला वेगळीच गती मिळण्याची शक्यता असू शकते. जर तुम्ही फलंदाजी करत असाल तर तुम्हाला धावाही करता येऊ शकतात. त्यामुळे एका चांगल्या खेळासाठी हे मैदान अतिशय पोषक आहे. जर तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या संसाधनांबद्दलची माहिती असेल तर तुम्हाला सामना जिंकणं सोपं जातं.

कानपूरमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान भारतीय संघ अगदी जिंकण्याच्या टप्प्यात होता. मात्र न्यूझीलंडच्या संघाने केलेल्या दणदणीत खेळीमुळे शेवटच्या अर्ध्या तासातच उरलेल्या चेंडूंचा सामना करत त्यांनी विजय मिळवला. विराट कोहली या आधीच्या सामन्यात खेळत नव्हता. मात्र आता त्याच्या पुनरागमनामुळे संघाला बळकटी प्राप्त होईल. काही खेळाडू सध्या फॉर्मात नसल्याने सामन्यातल्या खेळीची जबाबदारी प्रामुख्याने ओपनिंग बॅट्समन तसंच त्यानंतर खेळणाऱ्या खेळाडूंच्या खांद्यावर असेल.