India vs West Indies 5th T20: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाला ३-२ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ब्रॅंडन किंगच्या ८५ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. शेवटच्या सामन्यात विंडीज संघाला १६६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी केवळ १८ षटकांत पूर्ण केले. त्याचवेळी या मालिकेतील पराभवानंतरही कर्णधार हार्दिक पांड्याने आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. त्याचे हे आश्चर्यचकित करणारे विधान चाहत्यांना अजिबात आवडले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेतील पराभवानंतर प्रेझेंटेशन दरम्यान भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, “मी जेव्हा फलंदाजीसाठी आलो तेव्हा आमची लय हरवली होती. आम्ही परिस्थितीचा फायदा घेऊ शकलो नाही. चांगली खेळपट्टी असूनही आम्ही खराब फटके मारून बाद झालो, आपण स्वतःला आव्हान दिले पाहिजे. येथूनच काहीतरी धडा घ्यायला हवा, त्यामुळे सर्व युवा खेळाडूंना एक वेगळा अनुभव मिळाला असेलच. आम्हाला सर्वकाही तपशीलवार सांगण्याची गरज नाही. मला माहित आहे की संघातील सर्व खेळाडूंना ही गोष्ट समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. प्रत्येक खेळाडूला कुठे चुकलो याची माहिती असून ते त्यावर काम करतील अशी मला आशा आहे.”

हेही वाचा: IND vs WI 5th T20: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! वेस्ट इंडीजने आठ विकेट्स राखून भारताचा उडवला धुव्वा, मालिका ३-२ने घातली खिशात

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, “कधी कधी पराभव होणे हे देखील चांगले असते. जर आपण सकारात्मक बाजू बघितली तर मालिकेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले. युवा खेळाडूंचे कौशल्य पाहिले आहे आणि त्याचे श्रेय त्यांनाच द्यायला हवे. मैदानावर येताना मी सतत नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असे. तो माझ्या मते प्रक्रियेचा एक भाग आहे. मी सामन्यातील त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार माझ्या मनात जे प्रथम येते ते मी करतो. हे काही रॉकेट सायन्स नाही. कोणत्याही युवा खेळाडूची चांगली कामगिरी पाहून मला सर्वाधिक आनंद होतो. ही सुरुवात आहे आणि पुढील वर्षीच्या टी२० विश्वचषकाला अजून खूप वेळ आहे. त्याआधी आम्ही आशिया चषक आणि ५० षटकांचा विश्वचषक जो भारतात होणार आहे त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत.”

सूर्यकुमार वगळता सर्व फलंदाज फ्लॉप

कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल (५), शुबमन गिल (९) स्वस्तात बाद झाले, सुरुवात चांगली झाली नाही पण त्यानंतर सूर्यकुमारने जबाबदारी सांभाळली. सूर्या (६१) आणि तिलक वर्मा (२७) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन (१३), हार्दिक पांड्या (१४) मधल्या फळीत मोठी खेळी खेळू शकले नाहीत. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने सर्वाधिक ४ विकेट्स घेतले.

हेही वाचा: IND vs WI 5th T20: सूर्याची एक चूक अन् टीम इंडियाला भुर्दंड? रिव्ह्यू न घेणे पडले शुबमन गिलला महागात

तिलक वर्माने बॅटने सर्वांना प्रभावित केले

भारतीय संघाच्या वतीने, तिलक वर्माने पदार्पण मालिका खेळत या टी२० मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. २० वर्षीय खेळाडूने ५ डावात १ अर्धशतकासह ५७.६७च्या सरासरीने एकूण १७३ धावा केल्या. याशिवाय भारताकडून सर्वाधिक विकेट्स कुलदीप यादवच्या खात्यात आल्या, ज्याने ४ सामन्यात ६ विकेट घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi captain hardik pandyas statement after losing the series it is good to lose many times avw
First published on: 14-08-2023 at 10:25 IST