Karachi Kings Owner On Virat Kohli vs Babar Azam Comparison: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम यांची तुलना होणं काही नवीन नाही. बाबर आझम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यापासून पाकिस्तानच्या चाहत्यांना वाटतंय की तो विराटला मागे सोडू शकतो.

बाबर आझम काही महिने आयसीसी फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी होता, त्यामुळे त्याच्या फलंदाजी शैलीवर शंका उपस्थित करता येणार नाही. मात्र, आता तर हद्दच पार झाली आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील कराची किंग्ज संघाचा मालक सलमान इकबालला वाटतंय की, कमबॅक केल्यानंतर बाबर विराटला मागे सोडून पुढे निघू शकतो.

काय म्हणाला सलमान इकबाल?

एका पॉडकास्टमध्ये बोलताना सलमान इकबालने बाबर आझमचं भरभरून कौतुक केलं. बाबर आझम सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. मात्र, सलमानला वाटतंय की तो लवकरच कमबॅक करू शकतो. याबाबत बोलताना तो म्हणाला, “माझं बोलणं नोट करून ठेवा, ज्यावेळी बाबर आझम कमबॅक करेल, त्यावेळी तो विराट कोहलीसह जगातील इतर खेळाडूंपेक्षाही मोठा खेळाडू असेल. त्याची तुलना ही सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि गॅरी सोबर्ससारख्या दिग्गजांसोबत केली जाईल. त्याच्याकडे तो क्लास आहे, तुम्ही त्याला बदलू शकत नाही. तो जोरदार कमबॅक करणार.”

विराटला मागे टाकणं हे बाबर आझमसाठी मुळीच सोपं नसेल, कारण विराटने बाबरला खूप मागे सोडलं आहे. विराट ज्यावेळी आऊट ऑफ फॉर्म होता, तेव्हाही त्याची आकडेवारी ही इन फॉर्म बाबर आझमहून चांगली होती. बाबर गेल्या काही महिन्यांपासून वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसून आला आहे. भारतात झालेला वनडे वर्ल्डकप २०२३, त्यानंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ आणि पाकिस्तानात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही बाबरचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता.

आता सध्या तो पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत कराची किंग्ज संघाकडून खेळतोय. या स्पर्धेतही त्याचा फ्लॉप शो सुरूच आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. पहिल्या सामन्यात शून्य तर दुसऱ्या सामन्यात तो एका धावेवर माघारी परतला; तर दुसरीकडे विराट धावांचा पाऊस पाडतोय, त्यामुळे सध्यातरी बाबर विराटला मागे सोडून पुढे जाईल असं चित्र दिसत नाही.

बाबर आझमचा रेकॉर्ड पाहिला तर त्याच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये ६२३५ धावा, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४२२३ धावा, तर कसोटी क्रिकेटमध्ये ४२३५ धावा करण्याची नोंद आहे. विराटच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर वनडेमध्ये १४१८१ धावा, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४१८८ धावा आणि कसोटी क्रिकेटमध्ये ९२३० धावा करण्याची नोंद आहे.