IPL 2023, RCB vs MI Highlights Update : चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची आऱसीबीच्या गोलंदाजांनी दाणदाण केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर वधेराने २१ धावांची खेळी केली. मात्र, टिम डेविड, ऋतिक शौकीनला धावांचा सूर गवसला नाही. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने दमदार अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीला विजयी सलामी दिली. आरसीबीने १६. २ षटकात २ विकेट्स गमावत १७२ धावा केल्या. त्यामुळे मुंबईचा पराभव झाला. आरसीबीसाठी विराट कोहलीने ४९ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली. या इनिंगमध्ये विराटने ६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. तसंच कर्णधार फाफ डु प्लेसिसनेही आक्रमक फलंदाजी करत ४३ चेंडूत ७३ धावांची धडाकेबाज खेळी केली. फाफने ५ चौकार आणि ६ षटकार मारले. दिनेश कार्तिकला भोपळाही फोडला आला नाही. तर ग्लेन मॅक्सवेलने ३ चेंडूत १२ धावांची खेळी साकारली. मुंबईचे गोलंदाज कॅमेरुन ग्रीन आणि अर्शद खानला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.