Royal Challengers Bangalore Unwanted Record : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी आयपीएल २०२४ चा हंगाम आतापर्यंत काही खास राहिलेला नाही. विशेषत: आरसीबीचे गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. कोलकाता नाईट रायझर्सविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यातही आरसीबीच्या गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या. या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. असा विक्रम जो आजपर्यंत कोणत्याही संघाच्या नावावर नोंदवला गेला नव्हता.

आरसीबीच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद –

यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे गोलंदाज पॉवरप्लेच्या षटकांतमध्ये चांगलेच महागडे ठरत आहेत. केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही आरसीबीच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये ७५ धावा खर्च केल्या. या हंगामात आरसीबीच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये ७०हून धावा खर्च करण्याची ही चौथी वेळ आहे. तसेच, आता आरसीबी संघ आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ बनला आहे, ज्याने एकाच हंगामात ४ वेळा पॉवरप्लेमध्ये ७०हून धावा दिल्या आहेत.

पॉवरप्लेमध्ये आरसीबीची अवस्था वाईट –

पॉवरप्लेमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे गोलंदाज धावा वाचवण्यात सातत्याने अपयशी ठरत आहेत. या हंगामात, आरसीबीने पॉवरप्लेमध्ये फक्त एकदाच ५० पेक्षा कमी धावा दिल्या आहेत आणि ७ वेळा ५० हून अधिक धावा दिल्या आहेत. केकेआरविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीने पॉवरप्लेमध्ये ८५ धावा खर्च केल्या होत्या. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये ७६ धावा दिल्या होत्या.

हेही वाचा – IPL 2024 : हार्दिक किंवा पंत नव्हे, तर ‘हा’ २४ वर्षीय खेळाडू असू शकतो भारताचा भावी कर्णधार, ‘मिस्टर आयपीएल’चे वक्तव्य

आयपीएल २०२४ च्या पॉवरप्लेमधील आरसीबीच्या गोलंदाजांची स्थिती –

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध – ६२/१
पंजाब किंग्स विरुद्ध – ४०/१
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध – ८५/०
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध – ५४/१
राजस्थान रॉयल्स विरुद्ध – ५४/१
मुंबई इंडियन्स विरुद्ध – ७२/०
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध – ७६/०
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध – ७५/३

हेही वाचा – KKR vs RCB : ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने रचला इतिहास, IPL मध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला तिसरा खेळाडू

आरसीबीला मिळाले २२३ धावांचे लक्ष्य –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार अय्यरचे अर्धशतक आणि सॉल्ट-रमणदीप यांच्या वेगवान खेळीच्या जोरावर केकेआरने आरसीबीसमोर २२३ धावांचे लक्ष्य ठेवले. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु केकेआर संघाने २० षटकांत ६ गडी गमावून २२२ धावा केल्या. आरसीबीकडून कॅमेरून ग्रीन आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.