0हैदराबादच्या संघाविरूद्ध मुंबई इंडियन्सने ३४ धावांनी दमदार विजय मिळवला. शारजाच्या मैदानावरील सामन्यात मुंबईच्या संघाने २०८ धावांपर्यंत मजल मारली. क्विंटन डी कॉकचे अर्धशतक आणि इतर फलंदाजांच्या छोटेखानी खेळी यांच्या जोरावर मुंबईने दोनशेपार मजल मारली. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ २० षटकांत १७४ धावांपर्यंतच मजल मारु शकला. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ६० धावांची झुंजार खेळी केली, पण त्याला चांगली साथ लाभली नाही. त्यामुळे हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर बोलताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने एक महत्त्वाचं वक्तव्य केलं.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकने झुंजार अर्धशतक ठोकलं. त्याच्या ६७ धावांच्या खेळीने संघाची धावसंख्या दीडशेपार पोहोचली. परंतु हार्दिक पांड्या (२८), कायरन पोलार्ड (२५*) आणि कृणाल पांड्या (२०*) यांच्या छोटेखानी खेळीमुळे मुंबईला दोनशेपार मजल मारता आली. त्याबाबत बोलताना रोहित म्हणाला, “संघात तीन तडाखेबाज खेळाडू असताना कोणाला निवडायचं ही डोकेदुखी असते. पण अशी डोकेदुखी असणं कोणत्याही कर्णधारासाठी चांगलंच आहे. त्यातही महत्त्वाचं म्हणजे ते तीनही तडाखेबाज खेळाडू फॉर्ममध्ये असणं हे तर सोन्याहून पिवळं. कृणालने स्पर्धेत फारशी फलंदाजी केली नव्हती. पण आज त्याने स्वत:ला सिद्ध केलं. त्याने अवघ्या ४ चेंडूत केलेल्या २० धावांची खेळी खरंच अफलातून होती अन त्यामुळेच आम्ही २००चा आकडा गाठू शकलो.”

“खेळपट्टी नेहमीपेक्षा थोडी संथ होती, त्यामुळे दोनशेपार मजल मारणं कठीण होतं पण कृणालच्या खेळीने तो कारनामा करून दाखवला. आमच्या डोक्यात कोणतीही धावसंख्या नव्हती. आम्ही सारं काही गोलंदाजांवर सोडलं होतं. गोलंदाजांच्या मर्जीनुसार आम्ही फिल्डींग लावली आणि त्याचा आमचा चांगला परिणाम पाहायला मिळाला”, असे रोहितने स्पष्ट केलं.